नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून राहिलेल्या आणि प्रदीर्घ काळापासून न्यायालयात प्रलंबित असलेला शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा खटला पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. याप्रकरणी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार होती. मात्र, सुनावणीआधीच कोर्टाने या खटल्याला पुढची तारीख दिली. त्यामुळे आता या खटल्याची सुनावणी येत्या शुक्रवारी म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी होणार आहे. राज्यात महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर होणाऱ्या या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते.
शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी २१ जानेवारीला घेण्याचे ठरविण्यात आले होते. ही अंतिम सुनावणी घेऊन बुधवारी अथवा गुरुवारी निकाल येणे अपेक्षित होते. मात्र, पुन्हा एकदा सुनावणी लांबणीवर पडली. २१ जानेवारीला सकाळी ११ वाजता ही सुनावणी घेण्याचे गेल्यावेळी कोर्टाने सांगितले होते. अंतिम सुनावणीत साधारण ५ तासांचा वेळ ठाकरे आणि शिंदे यांच्या वकिलांना देण्यात येणार होता. मात्र, सॉलिसिटर जनरल यांनी कोर्टात एका दुसऱ्या प्रकरणात त्यांना सुनावणीसाठी जावे लागत आहे, असे सांगितले. त्यावर दोन्ही पक्षकारांची मते जाणून ही सुनावणी शुक्रवारी सकाळी ११ वाजता घेण्याचे ठरवले.
सरोदे यांना शंका
बुधवारी सकाळीच वकील असीम सरोदे यांनी ही सुनावणी होण्याची शक्यता कमी असल्याची माहिती दिली होती. दुपारी एक वाजेपर्यंतच सरन्यायाधीश सूर्य कांत त्यांच्या नियमित कोर्टातील कामकाज करतील, कारण दुपारी एक वाजल्यापासून सरन्यायाधीश हे न्या. जोयमाला बागची यांच्यासोबत गठीत करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाचे कामकाज करणार आहेत. अरवली पर्वतरांगाबाबतच्या केसची सुनावणी घेण्यात येईल. त्यामुळे शिवसेना सत्तासंघर्ष, पक्ष पळविणे, धनुष्यबाण चिन्ह याबाबतची सुनावणी घेतली जाईल अशी आशा करता येणार नाही, असे त्यांनी म्हटले होते. येत्या शुक्रवारीही ही सुनावणी होण्याबाबत सरोदे यांनी शंका व्यक्त केली आहे.
सुनावणी झाली असती तर धक्का बसला असता - सुषमा अंधारे
माननीय सर्वोच्च न्यायालयाने आमच्या अपेक्षेप्रमाणे तारीख पुढे ढकलल्याबद्दल जाहीर आभार! आज सुनावणी झाली असती तर मात्र धक्का बसला असता. ३७ नंबरचे मॅटर कधी बोर्डावरच येणार नाही. आपण भाबडा आशावाद सोडूया आणि ताकदीने लढू या, असे ट्विट शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केले आहे.