शिवसेना कुणाची; अखेर तारीख ठरली, सुप्रीम कोर्टात ८ ऑक्टोबरला होणार अंतिम सुनावणी

गेल्या तीन वर्षांपासून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाचे या खटल्याची अंतिम सुनावणी ८ ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे.
शिवसेना कुणाची; अखेर तारीख ठरली, सुप्रीम कोर्टात ८ ऑक्टोबरला होणार अंतिम सुनावणी
Published on

नवी दिल्ली : गेल्या तीन वर्षांपासून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाचे या खटल्याची अंतिम सुनावणी ८ ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे. संगणक प्रणालीत ८ ऑक्टोबर ही तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सुप्रीम कोर्ट या वादावर निर्णय देणार आहे. या निकालाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.

सध्या राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या वादावर १९ ऑगस्टपासून सुनावणी सुरू होणार आहे. त्यानंतर शिवसेना कुणाची या वादाचा फैसला ऑक्टोबर महिन्यात येणार आहे. राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या वादामध्ये राष्ट्रपतींनी सुप्रीम कोर्टाकडे मागितलेल्या सल्ल्याला उत्तर देण्यासाठी घटनापीठाची स्थापना करण्यात आली आहे. त्यात न्या. सूर्यकांत यांचाही समावेश आहे. न्या. सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोरच शिवसेना चिन्ह आणि नावाचा खटला सुरू आहे.

त्यामुळे शिवसेना खटल्याची सुनावणी लांबणीवर पडली आहे. १९ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या काळात राष्ट्रपती आणि राज्यपाल वादावर घटनापीठाची सुनावणी होणार आहे. त्यात दिवाळीच्या नंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतील असे बोलले जात आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना कुणाची हा फैसला सुप्रीम कोर्ट देणार आहे.

दीर्घकाळ न्यायप्रविष्ट असलेल्या शिवसेना नाव आणि चिन्हाच्या खटल्यावर लवकर सुनावणी घेऊन निर्णय द्या अशी याचिका उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. त्यावर १४ जुलैला सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. ही सुनावणी करताना न्या. सूर्यकांत, न्या. बागची यांच्या खंडपीठाने मुख्य याचिकेवर सुनावणी करणे योग्य राहील असे सांगत ऑगस्टमध्ये यावर सुनावणी घेऊ असे स्पष्ट केले होते. मात्र राष्ट्रपती-राज्यपाल वादातील खटल्यामुळे ही सुनावणी लांबणीवर पडली.

logo
marathi.freepressjournal.in