शिवसेना नाव, धनुष्यबाणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

जवळपास सव्वातीन वर्षांपूर्वी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या बंडखोरीनंतर अद्यापही शिवसेना कुणाची? हा प्रश्न अनुत्तरितच आहे. आता शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह या महत्त्वाच्या प्रकरणावर बुधवारी सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे अंतिम युक्तिवाद होणार आहे.
शिवसेना नाव, धनुष्यबाणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Published on

नवी दिल्ली : जवळपास सव्वातीन वर्षांपूर्वी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या बंडखोरीनंतर अद्यापही शिवसेना कुणाची? हा प्रश्न अनुत्तरितच आहे. आता शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह या महत्त्वाच्या प्रकरणावर बुधवारी सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे अंतिम युक्तिवाद होणार आहे. त्यानंतर सुप्रीम कोर्ट या प्रकरणाचा निकाल राखून ठेवणार की तत्काळ निकाल सुनावणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हावर निकाल जाहीर झाल्यास, त्यानुसार राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षाचे दोन गट निर्माण झाले. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन गटांमध्ये शिवसेना पक्षनाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हावरून सुरू असलेला वाद गेली तीन वर्षे सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला शिवसेना हे नाव व धनुष्यबाण चिन्ह दिले होते.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सुप्रीम कोर्टात बाजू मांडणारे वकील असीम सरोदे म्हणाले की, “धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मूळ शिवसेनेचे आहे. ते हिरावण्यात तसेच चोरण्यात आले आहे. संविधानिकदृष्ट्या जी चोरी झाली आहे ती पूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे. निर्णय झाला नाही किंवा एखाद्या प्रकरणात निर्णय न झाल्यामुळे सत्तास्थानी असतात. याचा अर्थ ते बरोबरच आहेत, संविधानिकदृष्ट्या योग्य आहेत असे होत नाही. त्यामुळे शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह हे परत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला द्यायचे, याबाबत सर्वोच्च न्यायालय निर्णय घेईल. त्यांनी ते परत दिले तर चांगलीच गोष्ट आहे. नाहीतर त्यांनी गोठवले तरी चालेल.”

logo
marathi.freepressjournal.in