शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालय याप्रकरणी पुढील सुनावणी १४ जुलैला घेणार आहे.
शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी
Published on

नवी दिल्ली : शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालय याप्रकरणी पुढील सुनावणी १४ जुलैला घेणार आहे.

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी पक्षाच्या निवडणूक चिन्हावर लवकरात लवकर निर्णय द्यावा, अशी मागणी ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे धनुष्यबाण मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी न्यायमूर्ती एमएम सुंदरेश आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर हा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी या आठवड्यात अथवा पुढील आठवड्यात याचिका तत्काळ सूचिबद्ध करण्याची मागणी केली.

विनंती फेटाळली

दरम्यान, खंडपीठाने आंशिक न्यायालयीन कामकाजाच्या दिवसांत ही याचिका सूचिबद्ध करण्यास सहमती दर्शवली नाही. तर एकनाथ शिदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी असे सांगितले की, ७ मे रोजी न्या. सूर्य कांत यांच्या खंडपीठाने तत्काळ सुनावणीची विनंती फेटाळून लावली होती. त्यावर, ठाकरे गटाची बाजू मांडणारे वकील कामत म्हणाले की, न्या. कांत यांच्या खंडपीठाने न्यायालयीन सुट्टीत हा मुद्दा उपस्थित करण्याची परवानगी दिली होती.

logo
marathi.freepressjournal.in