वंचितनेच चर्चा बंद केली - संजय राऊत

देशाच्या संविधानासाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी जनता आणि देशहितासाठी आपण एकत्र यायला पाहिजे. जो वंचित, पीडित समाज आहे त्यांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. यामुळेच आम्ही त्यांच्याशी चर्चाही केली आहे. आमच्या मनात काही खोटे नाही. पारदर्शकपणे चर्चा केली आहे,” असे संजय राऊत म्हणाले.
वंचितनेच चर्चा बंद केली - संजय राऊत
(संग्रहित छायाचित्र)

प्रतिनिधी/मुंबई

आम्ही वंचितसोबतची चर्चा बंद केली नाही तर त्यांच्या नेत्यांनीच चर्चा बंद केली, असे शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी स्पष्ट केले. वंचित चर्चा करीत नाही म्हणून आम्ही निवडणुका लढायच्या नाहीत काय, असा सवालही त्यांनी केला. देशातील निवडणूका या ईव्हीएमशिवाय व्हाव्यात ही सर्वसामान्य जनतेची मागणी आहे. भाजपमध्ये हिंमत असेल तर ईव्हीएमशिवाय निवडणूका घेऊन दाखवाव्यात, असे आव्हानही संजय राऊत यांनी दिले.

“वंचित बहुजन आघाडीने तीन जागांचा प्रस्ताव दिला, असे ते सांगत असले तरी आम्ही त्यांना पाच जागांचा प्रस्ताव दिला होता. अकोला, रामटेक, धुळे व मुंबईतील एका मतदारसंघाचा त्यात समावेश होता. आणखी एक जागा त्यांच्यासाठी राखून ठेवली होती. त्यामुळे आम्ही चर्चा केली नाही, असे त्यांनी म्हणू नये. देशाच्या संविधानासाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी जनता आणि देशहितासाठी आपण एकत्र यायला पाहिजे. जो वंचित, पीडित समाज आहे त्यांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. यामुळेच आम्ही त्यांच्याशी चर्चाही केली आहे. आमच्या मनात काही खोटे नाही. पारदर्शकपणे चर्चा केली आहे,” असे राऊत म्हणाले.

“पाच जागांच्या प्रस्तावात अकोला मतदारसंघही होता. शिवसेनेची विद्यमान जागा रामटेकही त्यांना सोडायची तयारी होती. त्यामुळे आम्ही वंचितसोबतची चर्चा बंद केलेली नाही, त्यांच्या नेत्यांनी ही चर्चा बंद केली आहे. आता त्यांनी सर्वत्र उमेदवार दिले आहेत. तरीही, अजूनही चर्चा होऊ शकते,” असे राऊत यांनी स्पष्ट केले.

“देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुका ईव्हीएमशिवाय व्हाव्यात, देशात परिवर्तन हवे, अशी देशातील सर्वसामान्यांची भावना आहे. त्यामुळे ईव्हीएम विरोधात देशभरात आंदोलन सुरू आहेत. वकीलसुद्धा रस्त्यावर उतरले आहेत. निवडणूक आयोगाला मोठ्या प्रमाणात पत्र, निवेदन देण्यात आली. आता भाजपनेही ईव्हीएमशिवाय निवडणुका घेण्याची हिंमत दाखवावी,” असे आव्हान राऊत यांनी दिले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in