उद्धव ठाकरे नांदेड, हिंगोली दौऱ्यावर

१९ मार्च रोजी हिंगोली मार्गे उमरखेडला जाणार आहेत. त्यानंतर हदगाव येथे दुपारी एक वाजता येणार आहेत.
उद्धव ठाकरे नांदेड, हिंगोली दौऱ्यावर

प्रतिनिधी/नांदेड : शिवसेना (उबाठा) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दि. १८, १९ मार्च रोजी नांदेड, हिंगोलीच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी ते नांदेड विमानतळावरून हिंगोलीकडे रवाना होणार असून, १९ रोजी ते नांदेड दौऱ्यावर येणार आहेत.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जनसंवाद दौऱ्याच्या अनुषंगाने रविवारी पक्षाच्या वतीने बैठक घेण्यात आली. यावेळी या पक्षाचे राज्यसंघटक एकनाथ पवार, जिल्हाप्रमुख माधव पावडे, प्रमोद उर्फ बंडू खेडकर, बबनराव बारसे, सहसंपर्क प्रमुख भुजंग पाटील, दत्ता कोकाटे, जिल्हा संघटक नेताजी भोसले आदींची उपस्थिती होती.

पवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकांची तयारी म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जनसंवाद दौरा करत आहेत. या दौऱ्यात ते कार्यकर्ते तसेच जनतेशी संवाद साधत आहेत. मराठा आरक्षण, बेरोजगारी, फोडाफोडीचे राजकारण याला जनता कंटाळली आहे, हे जनता सांगत आहे. महाविकास आघाडीचे राज्यातील सर्व जागा निवडून येतील, असे चित्र आहे. लवकरच महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा अधिकृतरीत्या करण्यात येईल. तसेच माधव पावडे म्हणाले, राज्यातील १२ आमदार हे पक्षाचे उंबरठे झिजवत आहेत. त्यात नांदेड उत्तरच्या आमदार कल्याणकर यांचाही समावेश आहे. परंतु, पक्षप्रमुख यांनी या सर्वांचे परतीचे दोर कापले आहेत. त्यामुळे पुन्हा पक्षात घेण्याचा प्रश्नच नाही. काल त्यांचे पोलीस संरक्षण काढताच आज गाडी फोडली. जनतेत जाण्याची यांची हिंमत नाही. ही सुरुवात आहे.

बंडू खेडकर म्हणाले, अशोक चव्हाण भाजपवासी झाल्यामुळे त्याचा महाविकास आघाडीला फायदा होणार आहे. चिखलीकर आणि चव्हाण यांचे विळ्या भोपळ्याचे नाते आहे. त्यामुळे चिखलीकर यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असेही त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे १८ रोजी सकाळी साडेनऊ वाजता विमानाने नांदेडला येणार आहेत. त्यानंतर ते हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे रवाना होतील. सव्वाबारा वाजता सेनगाव, सहा वाजता कळमनुरी येथे संवाद मेळावा होणार आहे. त्यानंतर हिंगोली येथे मुक्कामी असतील. १९ मार्च रोजी हिंगोली मार्गे उमरखेडला जाणार आहेत. त्यानंतर हदगाव येथे दुपारी एक वाजता येणार आहेत. अर्धापूर फाटा येथे दुपारी दोन वाजता, पिंपळगाव महादेव येथील अनुसया मंगल कार्यालयात दुपारी तीन वाजता संवाद मेळावा होणार आहे. त्यानंतर ते नांदेड विमानतळावरून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने रवाना होतील.

logo
marathi.freepressjournal.in