मुंबई : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महाविकास आघाडीत जागावाटपावरून रस्सी खेच सुरू होती. यात वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडने चार जागांचा प्रस्ताव दिला होता. परंतु, वंचितने तो प्रस्ताव अद्यापही मान्य केल्या नाही. यामुळे महाविकास आघाडीचे जागावाटप रखडले होते. अखेर आज ठाकरे गटाने १७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पहिली यादी ट्वीट केली आहे.
संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटले, "हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या १७ लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे."
ठाकरे गटाकडून उमेदवारांची यादी जाहीर होण्यापूर्वीच नाराजी नाट्य रंगल्याचे दिसून आले. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे हे दोघेही लढण्यास इच्छुक होते. परंतु, चंद्रकांत खैरे यांना पुन्हा एकदा पक्षाकडून उमेदवारी मिळणार असल्याचे निश्चित झाल्याच्या बातम्या आल्यानंतर दानवेंनी उघडपणे नाराजी व्यक्त करत अचानक नॉट रिचेबल झाले होते. त्यानंतर दानवे शिंदे गटात जाणार आणि संभाजीनगर येथून लढण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. परंतु, खुद्द दानवेंनी आपण कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले. उमेदवारी यादीत माझे नाव असणे-नसणे माझ्यासाठी महत्त्वाचा विषय नाही, असे दानवे म्हणाले.
ठाकरे गटाने पहिली यादी जाहीर केली असली तरी, ही चार ते पाच जागांवर उमेदवारांच्या नावांची अद्यापही घोषणा केली नाही. या चार ते पाच जागा वंचित बहुजन आघाडीसाठी ठाकरे गटाने सोडण्याचा निर्णय घेतल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांतून येत असून आता वंचित या जागांचा स्वीकार करत महाविकास आघाडीत जाणार की, स्वबळावर निवडणूक लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठाकरे गटाच्या उमेदवारांची नावे
१) बुलढाणा - नरेंद्र खेडकर
२) यवतमाळ-वाशिम - संजय देशमुख
३) मावळ - संजोग वाघेरे पाटील
४) सांगली - चंद्रहार पाटील
५) हिंगोली - नागेश आष्टिकर
६) छत्रपती संभाजीनगर - चंद्रकांत खैरे
७) धाराशिव - ओमराजे निंबाळकर
८) शिर्डी - भाऊसाहेब वाघचौरे
९) नाशिक - राजाभाऊ वाजे
१०) रायगड - अनंत गीते
११) सिंधुदुर्ग, रत्नागिरी - विनायक राऊत
१२) ठाणे - राजन विचारे
१३) मुंबई दक्षिण मध्य - अनिल देसाई
१४) मुंबई ईशान्य - संजय दिना पाटील
१५) मुंबई दक्षिण - अरविंद सावंत
१६) मुंबई वायव्य - अमोल किर्तीकर
१७) परभणी - संजय जाधव