

मुंबई : पक्षविरोधी कार्यवाही केल्याने हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांची शिवसेना (ठाकरे गट) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर कारवाई करण्यात आल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले आहे.
वानखेडे यांचा राजकीय प्रवास सरपंचपदापासून सुरू झाला. वानखेडे हे नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सदस्य होते. हदगाव विधानसभा मतदारसंघातून ते शिवसेनेच्या तिकिटावर तीन वेळा विजयी झाले होते. २००९ मध्ये हिंगोली मतदार संघातून निवडणूक लढवत तत्कालीन केंद्रीय मंत्री सूर्यकांत पाटील यांचा ७५ हजार मतांनी पराभव केला होता. मात्र २०१४ मध्ये काँग्रेसचे राजीव सातव यांनी वानखेडे यांचा पराभव केला. पराभवानंतर त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले.
मात्र २०१९ मध्ये ऐन निवडणुकीत ते काँग्रेसचा हात हातात घेत निवडणुकीच्या रिंगणात उतरले. परंतु सेनेचे उमेदवार हेमंत पाटील यांनी वानखेडे यांचा दोन लाख ७७ हजार मतांनी पराभव केला. त्यानंतर वानखेडे काँग्रेससोबत राहिले. परंतु काँग्रेस पक्षातही योग्य सन्मान मिळत नसल्याने पुन्हा घरवापसी करत ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवबंधन हाती बांधले. तर, आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस शिल्लक असतानाच ठाकरे गटाने वानखेडेंवर पक्षविरोधी कार्यवाही करीत त्यांची येथूनही हकालपट्टी केली आहे.