ठाकरे गटाच्या अजून एका नेत्याच्या अडचणीत वाढ, रवींद्र वायकर पोहोचले ED कार्यालयात; चौकशी सुरू

ठाकरे गटाच्या अजून एका नेत्याच्या अडचणीत वाढ, रवींद्र वायकर पोहोचले ED कार्यालयात; चौकशी सुरू

महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला असून आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार रवींद्र वायकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला असून आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार रवींद्र वायकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. वायकर सोमवारी (दि.29) सकाळी सक्तवसूली संचालनालयाच्या (ईडी) मुंबई कार्यालयात पोहोचले आहेत. जोगेश्वरीतील एका बांधकामाधीन आलिशान हॉटेलशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांची चौकशी सुरू असल्याचे समजते. जोगेश्वरीमधील कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी ते ईडीसमोर हजर झाले असल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. याआधीच्या दोन समन्सला वायकर हे गैरहजर राहिले होते. त्यामुळे आजच्या चौकशीला रविंद्र वायकर हे ईडी कार्यालयात हजर राहणार का? याबाबत शंका होती.

वायकरांच्या ईडी चौकशीबाबत अद्याप अधिक तपशील समजू शकलेला नाही. तथापि, जोगेश्वरी भूखंड आणि पंचतारांकित हॉटेल प्रकरणातील आर्थिक व्यवहारांबाबत ईडी तपास करीत आहे. याप्रकरणी सप्टेंबर महिन्यात महापालिकेचे उपअभियंता संतोष मांडवकर यांच्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलीस ठाण्यात रवींद्र वायकर यांच्यासह त्यांची पत्नी मनीषा वायकर, त्यांचे व्यावसायिक भागीदार आसू नेहलनाई, राज लालचंदानी, पृथ्वीपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरुण दुबे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे. याच गुन्ह्याच्या आधारावर ईडीने नोव्हेंबर महिन्यात एन्फोर्समेंट केस इन्फर्मेशन रिपोर्ट (ईसीआयआर) दाखल केला होता. त्याप्रकरणी ईडीने वायकर यांच्या घरासह सात ठिकाणी छापे टाकले होते.

याप्रकरणी ईडीने २३ जानेवारी रोजी वायकर यांना चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले होते. पण, या चौकशीला वायकर आरोग्याचे कारण देत अनुपस्थित राहिले होते. यापूर्वी ईडीने समन्स पाठवून वायकर यांना १७ जानेवारी रोजी चौकशीसाठी बोलावले होते. पण तेव्हाही ते चौकशीला उपस्थित नव्हते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in