भास्कर जाधव घरभेदींवर नाराज; मंत्रिपद न मिळाल्याचीही खंत : केवळ ठाकरेंना दिलेल्या शब्दासाठी लढतोय!

शिवसेनेतील घरभेदींवर नाराजी व्यक्त करतानाच, आपल्याला मंत्रिमंडळ झाला तेव्हा मंत्रिपद मिळायला हवे होते, अशी खंत शिवसेना ठाकरे गटातील फायरब्रँड नेता भास्कर जाधव यांनी व्यक्त केली. तसेच...
भास्कर जाधव घरभेदींवर नाराज; मंत्रिपद न मिळाल्याचीही खंत : केवळ ठाकरेंना दिलेल्या शब्दासाठी लढतोय!
Published on

विशेष प्रतिनिधी/मुंबई

शिवसेनेतील घरभेदींवर नाराजी व्यक्त करतानाच, आपल्याला मंत्रिमंडळ झाला तेव्हा मंत्रिपद मिळायला हवे होते, अशी खंत शिवसेना ठाकरे गटातील फायरब्रँड नेता भास्कर जाधव यांनी व्यक्त केली. तसेच, आपण केवळ उद्धव ठाकरे यांना दिलेल्या शब्दासाठी लढत असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

दोन दिवसांपूर्वी आपल्या समर्थकांना उद्देशून भावनिक पत्र लिहून जाधव यांनी आपल्या मनातील खंत बोलून दाखविण्यासाठी आज चिपळूणमध्ये जाहीर सभा घेतली. पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तार झाला, तेव्हा मला मंत्रिपद मिळायला हवे होते. मी उद्धव ठाकरे यांच्यासाठी लढत आहे. परंतु मला ना मंत्रिपद मिळाले, गटनेतेपद मिळाले. खरे तर त्यावेळी मंत्रिपद हा माझा हक्क होता, अशा शब्दांत खंत बोलून दाखविली. तसेच मी जेव्हा मैदानात उतरून लढलो, त्यावेळी आपल्याच पक्षातील घरभेदींनी असे बोलायची गरजच काय होती, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. असे जरी असले तरी मी उद्धव ठाकरे यांना सोडून कुठेही जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पक्ष फुटल्यानंतर कोणाला गटनेते करायला हवे होते, विधानसभेत कोणाचा आवाज आहे, याचा अंदाज सर्वांना आहे. खरेतर हे सांगायची गरजच नव्हती; परंतु आपला यासंदर्भात कधीच विचार केला गेला नाही. त्यामुळे आज सांगायची वेळ आली आहे. मी आधीच उद्धव ठाकरे यांना सांगितले होते की, तुम्ही कुठेही जा; परंतु तुम्ही भाजपसोबत गेल्यास मी आपल्यासोबत नाही, असे आधीच सांगितले होते. त्यावर कोण कुठे गेले तरी चालेल; परंतु आपण दोघे राहू, असे मला खुद्द उध्दव ठाकरे म्हणाले. त्याच शब्दाला जागून मी पक्षप्रमुखांना दिलेल्या शब्दासाठी लढत असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

पक्षासाठी बेडरपणे संघर्ष करीत असताना आपल्यातीलच काही घरभेदी संभ्रम निर्माण करीत आहेत. सिंधुदुर्गात जाऊन मी थेट राणेंच्या विरोधात आक्रमकपणे बोललो, त्यावेळी तिथे जाऊन बोलण्याची काय गरज होती, असे बोलत आहेत. पण या संघर्षासाठी जे माझ्यासोबत मैदानात उतरले, त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. पण हा कार्यकर्ता आमचा नाही, तो भास्करराव जाधव यांचा आहे, त्याला बाहेर काढा, असे म्हटले जात आहे. ४० वर्षांच्या कारकिर्दीत प्रथमच असा अनुभव घेत आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखविली.

चिपळूणमध्ये जेव्हा राडा झाला, तेव्हा मी पदाधिकाऱ्यांचा जामीन घेतला. त्यावेळी माझ्यावर प्रचंड दबाव आला. गैरसमज पसरवले गेले. बदला घेतला जाईल, असा इशारा देण्यात आला. पोलिसांनीही दबाव आणला. परंतु मी मागे हटलो नाही. मी आक्रमकपणे बोलतो. परंतु कोणावरही व्यक्तिगत टीका केली नाही. तरीही माझ्याविरोधात काही लोक सक्रिय आहेत, असे का केले जाते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

पुत्राच्या भाषणावेळी जाधवांना अश्रू अनावर

कार्यकर्ता मेळाव्यात पुत्र विक्रांत जाधव यांचे भाषण झाले. विक्रांत जाधव यांच्या नियोजनामुळे हा मेळावा उत्कृष्टरित्या पार पडला. त्यावेळी विक्रांत जाधव यांनी भास्कर जाधव उद्धवसाहेबांची साथ सोडणार नाहीत. पाठ दाखवून पळणे आमच्या रक्तात नाही, असे म्हटले. त्यावेळी भास्कर जाधव यांच्या डोळ्यात अश्रू आले. यावेळी त्यांनी भास्कर जाधव यांच्याबद्दल ज्या माध्यमात बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्या सर्व निराधार आहेत, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी आ. योगेश कदम यांच्यावरही हल्लाबोल केला.

सेनेला केंद्रस्थानी नेणे हेच माझे कर्तव्य

मी आजपर्यंत कधीही माझी व्यक्तिगत चिंता केली नाही. शिवसेनेला सत्तेच्या केंद्रस्थानी पोहोचविणे हेच माझे ध्येय आहे. संघर्षाच्या वेळी मी स्वत: मैदानात उतरतो, तेच काम मी आतापर्यंत केले आहे. यापुढेही ते करीत राहणार आहे, असेही त्यांनी बोलून दाखविले. विरोधात असलेल्या स्थानिक कार्यकर्त्यांसोबतच पक्षातील नेत्यांनी अन्याय केल्याचे अप्रत्यक्षरित्या त्यांनी सांगितले. त्यामुळे ते नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in