ठाकरेंना पुण्यात धक्का; कोथरूडमध्ये 'मशाल' विझली; अधिकृत उमेदवारांनीच केला भाजपमध्ये प्रवेश

महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत कोथरूड विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठे भगदाड पडले आहे. प्रभाग क्रमांक ९ आणि ११ मधील उबाठा गटाच्या अधिकृत आणि बंडखोर उमेदवारांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
ठाकरेंना पुण्यात धक्का; कोथरूडमध्ये 'मशाल' विझली; अधिकृत उमेदवारांनीच केला भाजपमध्ये प्रवेश
Published on

पुणे : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत कोथरूड विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठे भगदाड पडले आहे. प्रभाग क्रमांक ९ आणि ११ मधील उबाठा गटाच्या अधिकृत आणि बंडखोर उमेदवारांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला असून, त्यामुळे कोथरूडमध्ये भाजपची ताकद वाढली आहे.

भाजपच्या विजयावर झाले शिक्कामोर्तब

या राजकीय घडामोडीत प्रभाग ९ मधील उबाठा गटाचे बंडखोर उमेदवार महेश सुतार आणि पूजा सुतार, तसेच नियोजन समितीचे सदस्य सुखदेव तापकीर यांनी भाजपचा झेंडा हाती धरला. त्याचप्रमाणे प्रभाग ११ मधून उबाठा गटाचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब धनवडे, विद्यार्थी सेनेचे अमर गायकवाड आणि माजी नगरसेवक पैलवान दिलीपदादा गायकवाड यांनीही आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करत महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला. चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या पुणे येथील निवासस्थानी सर्व नूतन सदस्यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘भाजपचे दोन उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत आणि आता या महत्त्वाच्या पक्षप्रवेशांमुळे भाजपच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले आहे. ही केवळ सुरुवात असून आगामी काळात भाजप महापालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवेल’.

भाजपचे पारडे झाले जड

या प्रसंगी भाजपचे उमेदवार लहू बालवडकर, गणेश कळमकर, रोहिणी चिमटे, अजय मारणे, अभिजीत राऊत यांसह डॉ. संदीप बुटाला, प्रकाशतात्या बालवडकर आणि इतर प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर उबाठा गटाच्या उमेदवारांनीच साथ सोडल्याने या प्रभागांमध्ये भाजपचे पारडे आता जड झाले आहे.

logo
marathi.freepressjournal.in