ठाकरे गटाची पहिली यादी आज जाहीर होणार

वंचितला अजूनही सोबत घेण्याचे महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रकाश आंबेडकर यांना आणखीन एका जागेची ऑफर देण्यात आल्याने ठाकरे गटाची उमेदवारांची घोषणा एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे.
ठाकरे गटाची पहिली यादी आज जाहीर होणार

प्रतिनिधी/मुंबई

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवारांची पहिली यादी मंगळवारी जाहीर होईल, असे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले होते. मात्र आता ठाकरे गटाची पहिली यादी बुधवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीत ठाकरे गटाच्या १५ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येणार असल्याचे समजते. वंचितला अजूनही सोबत घेण्याचे महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रकाश आंबेडकर यांना आणखीन एका जागेची ऑफर देण्यात आल्याने ठाकरे गटाची उमेदवारांची घोषणा एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे.

शिवसेना ठाकरे गटाची पहिल्या १५ उमेदवारांची यादी मंगळवारी जाहीर करण्यात येईल, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. ठाकरे गट २२ जागा लढविणार आहे. त्यातील १५ उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. उर्वरित ७ जागांचे काय होणार, हे त्यानंतर स्पष्ट होईल. ठाकरे गटाची यादी मंगळवारी जाहीर झाली असती तर त्यानंतर प्रकाश आंबेडकरदेखील पत्रकार परिषद घेणार होते. मात्र आघाडीकडून वंचितला आणखी एका जागेची ऑफर देण्यात आल्याचे समजते. त्यावर विचार झाल्यानंतर बुधवारी ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर होईल. त्यानंतर प्रकाश आंबेडकर हे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करणार आहेत.

वंचितच्या समावेशाचे भिजत घोंगडे

वंचितचा आघाडीत समावेश होणार की नाही, याबाबतचे घोंगडे अद्यापही भिजतच पडले आहे. आतापर्यंत झालेल्या घडामोडी पाहता, वंचित आघाडीत येणार नाही, हेच स्पष्ट होत आहे. आघाडीने वंचितला ४ जागांचा प्रस्ताव दिला होता. वंचितने आघाडीकडे ६ जागांची मागणी केली होती. आता वंचितला आणखी एका जागेचा प्रस्ताव दिल्याचे समजते. म्हणजेच ४ ऐवजी ५ जागांचा प्रस्ताव आघाडीने वंचितला दिला आहे. यावर वंचित आता काय निर्णय घेणार, हे पाहावे लागणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in