शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग या ११ आणि तमिळनाडूच्या जिंजी किल्ल्याचा ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत
Published on

मुंबई : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग या ११ आणि तमिळनाडूच्या जिंजी किल्ल्याचा ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्थेच्या (युनेस्को) पॅरिसमध्ये सुरू असलेल्या बैठकीत यासंबंधीच्या प्रस्तावावर मंजुरीची मोहर उमटली.

भारतात सध्या ४२ जागतिक वारसा स्थळे आहेत. आता १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये समाविष्ट झाल्यामुळे हे किल्ले महाराष्ट्रातील ‘सातवे जागतिक वारसा स्थळ’ ठरतील. यामध्ये महाराष्ट्रातील ११ किल्ले आणि तमिळनाडूमधील १ किल्ला असे एकूण १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले असून, त्यांची ‘अद्वितीय जागतिक मूल्य’ म्हणून नोंद घेतली गेली आहे. यापुढे हे समाविष्ट झालेले किल्ले साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूतील जिंजी हे आता जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाणार आहेत.

१७व्या आणि १९व्या शतकात विकसित झालेली 'भारतातील मराठा लष्करी भूदृश्ये', त्या काळातील मराठा शासकांच्या कल्पनेतून साकारलेली अभेद्य तटबंदी आणि मराठा सैन्याच्या असामान्य लष्करी व्यवस्थेचा भक्कम पुरावा आहेत. किल्ल्यांचे हे एकमेवाद्वितीय जाळे, त्यांच्या महत्त्वानुसार ठरवलेला त्यांचा क्रम, व्याप्ती आणि प्रतीकात्मक वैशिष्ट्यांमध्ये असलेले वैविध्य, सह्याद्रीच्या पर्वत रांगा, मनमोहक कोकण किनारा, दख्खनचे पठार आणि भारतीय द्वीपकल्पातील पूर्व घाट यांच्यातील वैशिष्ट्यपूर्ण भूदृश्य, भूप्रदेश आणि भौतिक वैशिष्ट्ये यांचा अनोखा मिलाफ आहे.

अद्वितीय वैश्विक मूल्य

महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे, शिवप्रेमींचे मन:पूर्वक अभिनंदन.. स्वराज्यनिर्मिती आणि ते टिकविण्यासाठी महाराजांनी हे किल्लेवैभव उभारले. शत्रूला न दिसणारे दरवाजे आणि किल्ल्यांचे माची स्थापत्य हे मराठा स्थापत्यशास्त्रातील महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे. हे माची स्थापत्य जगातील कोणत्याही किल्ल्यात दिसून येत नाही. ‘माची स्थापत्य’ म्हणजे गडाच्या सुरक्षिततेचा आणि युद्धकौशल्याचा मुत्सद्दीनीतीने रचलेला भाग आहे. हेच ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ आहे.

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

अभिमानाचा ऐतिहासिक क्षण!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीने उभारलेल्या आणि स्वराज्य स्थापनेचा भक्कम आधार ठरलेल्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मानांकन मिळणं, हे संपूर्ण देशासाठी आणि विशेषतः आपल्या महाराष्ट्रासाठी, मराठी जनांसाठी अभिमानाचा क्षण आहे. ही फक्त गड किल्ल्यांची नाव नाहीत, तर स्वराज्याच्या ध्येयासाठी महाराजांनी उभारलेल्या स्थापत्यशास्त्राची शिखरं आहेत. या दुर्गरचना म्हणजे युद्धनीती, मुत्सद्दीपणा आणि रक्षणशक्ती यांचे अभूतपूर्व उदाहरण आहेत. हा ऐतिहासिक आणि गौरवशाली क्षण आपल्या सर्वांसाठीच अभिमानाचा आहे.

आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य मंत्री

महाराष्ट्रातील ११ किल्ले आणि तामिळनाडू मधील १ किल्ला असे एकूण १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या या कामात अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघानेही खारीचा वाटा उचलला आहे. या बाराही किल्ल्यांचे स्केल मॉडेल्स अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या गिर्यारोहक स्वयंसेवकांनी अत्यंत विक्रमी वेळेत पूर्ण करून दिल्ली येथे पार पडलेल्या युनेस्कोच्या प्रतिनिधींनी भेट दिलेल्या प्रदर्शनात आकर्षणाचे केंद्र बनले होते. सर्व भारतीयांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे.

-उमेश झिरपे, ऋषिकेश यादव,

अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ

१२ किल्ल्यांचा समावेश

किल्ले साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तमिळनाडूतील जिंजी

logo
marathi.freepressjournal.in