शिवाजी महाराजांनी पंचक्रांती देऊन परकीयांना आव्हान दिले; माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांचे प्रतिपादन

ब्रिगेडियर राहुल दत्त म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे कुटनीती, संघटनशक्ती आणि प्रशासन यामध्ये निपुण होते.
शिवाजी महाराजांनी पंचक्रांती देऊन परकीयांना आव्हान दिले; माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांचे प्रतिपादन

जळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांनी कृषी क्रांती, अर्थ क्रांती, सामाजिक क्रांती आणि लष्करी व सांस्कृतिक क्रांती अशी पंचक्रांती देवून १७व्या कालखंडात परकीयांना आव्हान देण्याचे काम केले. त्यातूनच या देशात मन्वंतर घडून आले. असे प्रतिपादन भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषदेचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे राष्ट्रबांधणी करणारे सर्वोत्कृष्ट नेतृत्व या विषयावर बोलत होते.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागाच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराजांची लष्करी नीती आणि प्रशासकीय धोरणांची आधुनिक युगातील प्रासंगिकता’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राला आज शुक्रवारी प्रारंभ झाला. या परिषदेत डॉ. सहस्त्रबुद्धे यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज - राष्ट्रबांधणी करणारे सर्वोत्कृष्ट नेतृत्व या विषयावर बीजभाषण केले.

या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी होते. विशेष निमंत्रीत म्हणून उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात विभागाचे बिग्रेडीयर राहुल दत्त उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, यांची मंचावर उपस्थिती होती.

डॉ. सहस्त्रबुद्धे आपल्या भाषणात म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे स्तिमित करणारे व्यक्तिमत्व आहे. सर्वंकष विचार, चातुर्यपूर्ण रणनिती याद्वारे त्यांनी परकीयांना आव्हान दिले. ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा ही शिवाजी महाराजांच्या कार्यात आहे. त्यामुळे शिवरायांच्या कार्यकर्तृत्वावर विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रम तयार करावा असे आवाहन त्यांनी केले. अठरापगड जातींना एकत्र करून मावळ्यांची फौज निर्माण केली. यातून लष्करी क्रांती घडली. यातूनच पुढे आपले आराध्य कसे जपायचे हे सांगून सांस्कृतिक क्रांती दृगोचर केली. नवे युद्धशास्त्र निर्माण करून लढाई ही विजयासाठीच करायची असते ही आकांक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी रुजविली असेही डॉ. सहस्त्रबुद्धे म्हणाले.

ब्रिगेडियर राहुल दत्त म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे कुटनीती, संघटनशक्ती आणि प्रशासन यामध्ये निपुण होते. त्यामुळे त्यांनी युद्धनीतीच्या विविध डावांचा अवलंब केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या किल्ल्यांचे बांधकाम पाहिल्यावर ते नौदलाचे पायोनिअर ठरतात. आज भारत ज्या उंचीवर उभा आहे त्याचे श्रेय हे छत्रपती शिवाजी महाराजांना आहे. आजही त्यांच्या विचारांची देशाला गरज आहे असे दत्त म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in