शिवद्रोही सरकारला हटवल्याशिवाय राहणार नाही! उद्धव ठाकरेंचा निर्धार, मविआचे महायुतीविरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन

मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ ‘मविआ’ने रविवारी महायुती सरकारविरोधात ‘गेटवे ऑफ इंडिया’ येथे ‘जोडे मारो’ आंदोलन केले.
शिवद्रोही सरकारला हटवल्याशिवाय राहणार नाही! उद्धव ठाकरेंचा निर्धार, मविआचे महायुतीविरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन
Published on

मुंबई : मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ ‘मविआ’ने रविवारी महायुती सरकारविरोधात ‘गेटवे ऑफ इंडिया’ येथे ‘जोडे मारो’ आंदोलन केले. या आंदोलनानंतर झालेल्या जाहीरसभेत बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, ‘हे शिवद्रोही, घटनाबाह्य सरकार असून ‘गेटवे ऑफ इंडिया’ येथून आता या सरकारला ‘गेट आऊट ऑफ इंडिया’ केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा निर्धार व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवद्रोही सरकारला हटवल्याशिवाय राहणार नाही!

घाईघाईने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. मात्र, आठ महिन्यांत पुतळा कोसळला आणि महायुतीचा भ्रष्ट कारभार जनतेसमोर उघडा पडला. महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील शिवप्रेमी जनतेचा रोष पाहून पालघर येथील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली ती पण मग्रुरीने, अशी टीका करीत त्यांनी मोदींनाही लक्ष्य केले.

पंतप्रधानांनी नेमकी कशासाठी माफी मागितली?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी कशासाठी मागितली? पुतळा पडला म्हणून माफी मागितली की पुतळा बसवताना भ्रष्टाचार झाला म्हणून मागितली? की भ्रष्टाचाऱ्यांवर पांघरूण घालण्यासाठी मागितली, अशी खोचक टीका त्यांनी केली.

‘जोडे मारो’ आंदोलनापूर्वी हुतात्मा चौकात हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कुलाबा येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून आणि गेटवे ऑफ इंडिया येथे महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन महायुती सरकारविरोधात ‘एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार’ यांच्या बॅनर्सला चपलांनी हाणत ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे, नाना पटोले, आदित्य ठाकरे, संजय राऊत, पृथ्वीराज चव्हाण, वर्षा गायकवाड, अस्लम शेख, भाई जगताप, नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, विनायक राऊत, अरविंद सावंत, छत्रपती शाहू महाराज, शिवसेना जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान आदी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४ डिसेंबर २०२३ रोजी घाईघाईने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. पुतळ्याचे अनावरण झाले आणि आठ महिन्यांत पुतळा कोसळला. पुतळा उभारणीत भ्रष्टाचार झाल्याने निकृष्ट दर्जाचे काम झाले हे स्पष्ट होते. याप्रकरणी विरोधकांनी आंदोलन केले तर भाजप त्याला राजकारण म्हणते, पण भाजपचे हे राजकारण नाही, तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या शब्दात सांगायचे झाल्यास हे भाजपचे ‘गजकर्ण’ आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपला खडेबोल सुनावले. नवीन संसद भवनात गळती, राम मंदिरात गळती हीच का ‘मोदी गॅरंटी’, असा टोलाही त्यांनी लगावला. तुम्हाला निवडून दिले ही जनतेने चूक केली का, असा सवाल उपस्थित करत ही चूक जनता परत करणार नाही आणि महायुतीला त्यांची जागा दाखवणार, असा इशारा त्यांनी महायुतीला दिला.

दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे - छत्रपती शाहू महाराज

राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर आठ महिन्यांत पुतळा कोसळला, हे देशातील नव्हे तर जगभरातील लोकांनी बघितले. छत्रपती शिवाजी महाराज राज्यातील जनतेचे दैवत आहेत, त्यामुळे महाराजांचा मान राखला पाहिजे. ज्या कोणामुळे ही दुर्दैवी घटना घडली, त्या दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी भूमिका छत्रपती शाहू महाराज यांनी यावेळी मांडली.

महाराजांच्या नावाने राजकारण करू नये - एकनाथ शिंदे

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला याचा त्रास राज्यातील जनतेला सहन करावा लागला. मात्र विरोधासाठी विरोध करण्याचे काम महाविकास आघाडीने सुरू केले आहे. जातीजातीत तेढ निर्माण करायचे काम मविआ नेते करत आहेत.‌ प्रत्येक बाबतीत ‘फेक नरेटिव्ह’ ते पसरवत आहेत, मात्र महाराजांच्या नावाने राजकारण करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मविआ’च्या नेत्यांना केले.

महायुतीच्या भ्रष्टाचाराचा हा नमुना - शरद पवार

वाऱ्यामुळे पुतळा पडला, असे सांगितले जाते. गेटवेवर हा पुतळा ५० वर्षांपासून आहे. पण तो अजूनही टिकून आहे. राज्यातही असे अनेक पुतळे आहेत. मात्र, मालवणमधील पुतळ्याच्या उभारणीत भ्रष्टाचार झाल्यानेच पुतळा पडला. महायुती सरकारच्या भ्रष्टाचाराचा हा नमुना असून, हा शिवप्रेमींचा अपमान आहे, अशी सडकून टीका शरद पवार यांनी केली.

महाराजांच्या नावाने पेशवाई सुरू - नाना पटोले

महाराजांच्या नावाने राजकारण करायचे आणि पेशवाईसारखे वर्तन करायचे असे हे शिवद्रोही सरकार आहे. आठ महिन्यांत पुतळा कोसळतो म्हणजे महायुती सरकारने भ्रष्टाचाराचा कळसच गाठला आहे, हे दिसून येते. मात्र, महाराजांचा अवमान राज्यातील जनता कदापि सहन करणार नाही, हे लक्षात येताच आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माफी मागितली, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

logo
marathi.freepressjournal.in