
मुंबई : बस चालवत मोबाइलवर क्रिकेट मॅच बघणाऱ्या खासगी चालकाला एसटी प्रशासनाने बडतर्फ केले आहे. तसेच एसटी प्रशासनाने संबंधित खासगी कंपनीला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. २२ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता दादर येथून स्वारगेटसाठी (पुणे) निघालेल्या खासगी ‘ई-शिवनेरी’ बसमधील चालक रात्री लोणावळाजवळ बस चालवताना क्रिकेट मॅच पाहत होता. त्याबाबतचे चित्रीकरण संबंधित बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना पाठवले.
याबाबत मंत्री सरनाईक यांनी तातडीने एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार एसटीच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी संबंधित खासगी संस्थेच्या चालकास प्रवाशांचा जीव धोक्यात घालून बेशिस्त वाहन चालवल्याप्रकरणी बडतर्फ केले असून संबंधित खासगी संस्थेला पाच हजारांचा दंड ठोठावला आहे.