मुंबई : दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई अटल सेतूने जोडण्यात आल्याने प्रवासाचा वेळ कमी झाला आहे. मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी एसटी महामंडळाने स्वारगेट ते मंत्रालय आणि पुन्हा मंत्रालय ते स्वारगेट या मार्गावर शिवनेरी बससेवा मंगळवारपासून सुरू केली आहे. ही बस अटल सेतूमार्गे दर सोमवारी आणि शुक्रवारी धावणार आहे.
अटल सेतूमुळे प्रवासाच्या वेळात बचत होऊ लागली आहे. या मार्गावरून एसटी बसेस चालविण्यात येत आहेत. अटल सेतूवरून पुणे ते दादर प्रवास करणाऱ्या बसला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यातच मंत्रालयीन कर्मचाऱ्यांनी मंत्रालय-स्वारगेट बसची मागणी केली होती. ही मागणी विचारात घेऊन महामंडळाने स्वारगेट ते मंत्रालय दरम्यान बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुण्याहून मंत्रालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना थेट बससेवा उपलब्ध नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. एसटी महामंडळाने सुरू केलेल्या या सेवेमुळे मंत्रालय, विधिमंडळ, उच्च न्यायालयात व छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाच्या परिसरात कामानिमित्त येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना फायदा होणार आहे.
सोमवारी आणि शुक्रवारी सेवा
महिलांना आणि ६५ ते ७५ वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना तिकिट दरात ५० टक्के सवलत आहे. ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के सवलत आहे. सोमवारी आणि शुक्रवारी ही बस स्वारगेट येथून सकाळी ६ वाजता सुटेल. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता पुन्हा परतीचा प्रवास सुरू होईल.
किती आहे तिकीट?
-फुल - 565
-हाफ - 295