
पेण : रायगड किल्ल्यावर होणाऱ्या श्री शिवराज्याभिषेक सोहळा २०२५ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ५ व ६ जून या दोन दिवसांच्या कालावधीत काही मार्गांवर जड व अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी यासंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.
श्री शिवराज्याभिषेक सोहळा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून ५ ते ६ जून रोजी रात्री १०:०० वाजेपर्यंत कालावधीत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाकणफाटा-नागोठणे ते कशेडीपर्यंत तसेच माणगांव-निजामपूरमार्गे पाचाड ते रायगड किल्ला, माणगांव ढालघरफाटा मार्गे पाचाड ते रायगड किल्ला, महाड नातेखिंड मार्गे पाचाड ते रायगड किल्ला या मार्गांवरील सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे.
श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन आज आणि उद्या (५ ते ६ जून) किल्ले रायगड येथे साजरा होणार आहे. या कार्यक्रमासाठी रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, मुंबई आदी ठिकाणांहून लाखो शिवभक्त आपआपली वाहने घेऊन रायगडकडे येतात. तसेच आयोजकांचे साहित्य वाहणारी वाहनेही मोठ्या प्रमाणात येतात. या सोहळ्यासाठी येणारे शिवभक्त माणगांव-निजामपूर मार्गे, माणगांव ढालघरफाटा मार्गे तसेच महाड नातेखिंड मार्गे पाचाड ते रायगड किल्ला असा प्रवास करतात. या मार्गांवरून शिवभक्तांची आणि शासकीय यंत्रणांच्या वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे या कालावधीत अपघात व वाहतूककोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या पार्श्वभूमीवर कुठेही वाहतूककोंडी निर्माण होऊ नये व शिवभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी ही वाहतूक बंदी जाहीर केली आहे. या अधिसूचनेची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत.
वाहतूक बंदी असलेले मार्ग
वाकणफाटा-नागोठणे ते कशेडी दरम्यान
माणगाव-निजामपूर मार्गे पाचाड ते रायगड किल्ला
माणगाव-ढालघरफाटा मार्गे पाचाड ते रायगड किल्ला
महाड-नातेखिंड मार्गे पाचाड ते रायगड किल्ला
बंदीतून यांना सूट
दूध, पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस वाहने
औषधे व ऑक्सिजन वाहतूक करणारी वाहने
भाजीपाला व जीवनावश्यक वस्तू वाहतूक
फायर ब्रिगेड आणि रुग्णवाहिका