
आज संपूर्ण देशभरात विजयी दशमी म्हणजेच दसऱ्याची जोरदार तयारी सुरु आहे. या निमित्ताने मुंबईत दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाची देखील जोरदार तयारी झाली आहे. उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर म्हणजेच शिवतिर्थावर पार पडणार आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतीस आझाद मैदानावर पार पडणार आहे.
अशातच आता सांगलीच्या शिवसैनिकांचा मोठा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईला निघालेल्या शिवसैनिकांच्या गाडीला पहाटेच्या सुमारास अपघात झाला आहे. या अपघातात एकाला जीव गमवावा लागला तर तिघे जणं जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातून जाणाऱ्या रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील शिरढोण गावाजवळ ही दुर्वेदी घटना घडली.
एक भरधाव ट्रकने शिवसैनिकांच्या गाडीला मागून धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिघे जणं जखमी झाले आहेत. हे लोकं शिंदे गटाच्या युवा सेनेचे पदाधिकारी असल्याची माहिती आहे.