... तर महाविकास आघाडीमध्ये पडू शकते फूट, संजय राऊतांनी दिले संकेत

महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनाही धक्का बसल्याचे राऊत म्हणाले. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते
... तर महाविकास आघाडीमध्ये पडू शकते फूट, संजय राऊतांनी दिले संकेत

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, राहुल गांधींनी वीर सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याशी शिवसेना सहमत नाही. सावरकरांबद्दलचे चुकीचे वक्तव्य शिवसेनेला मान्य नाही, शिवसेना ते खपवून घेणार नाही. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. मात्र, या यात्रेत वीर सावरकरांचा मुद्दा उपस्थित करण्याची गरज नसल्याचेही राऊत म्हणाले. हा मुद्दा उपस्थित करून केवळ शिवसेनेलाच धक्का बसला नाही, तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनाही धक्का बसल्याचे राऊत म्हणाले. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते, असे मोठे विधान राऊत यांनी केले आहे. नवा इतिहास घडला पाहिजे, इतिहासात काय घडले आणि काय घडले नाही यापेक्षा नवा इतिहास घडवावा, असे आमचे मत आहे. राहुल गांधींनी याकडे लक्ष द्यावे, असे राऊत म्हणाले. वीर सावरकरांना भारतरत्न द्यावा, अशी आमची मागणी आहे. ही मागणी आम्ही सातत्याने करत आहोत. भाजपमध्ये निर्माण झालेले नवे सावरकर भक्त सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी का घेत नाहीत, हे मला कळत नाही. असा सवाल राऊत यांनी यावेळी केला.

काय आहे नेमका वाद ?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद गुरुवारी राज्यात उमटले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इंग्रजांना लिहिलेले पत्र राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत सादर केल्यानंतर भाजप नेत्यांनी राहुल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी मुंबईतील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात राहुल गांधी यांच्याविरूद्ध तक्रार दाखल करत, त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. शिवसेना नेते, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याशी आपण सहमत नसल्याचे सांगताना, स्वातंत्र्यलढ्यात तुमच्यातील कोण होते, असा प्रतिसवाल भाजपला विचारला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा वाद येत्या काळात चांगलाच तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वाशीम येथे क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी आयोजित कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी म्हटले होते की, ‘एकीकडे देशासाठी अवघ्या २४ व्या वर्षी बलिदान देणारे बिरसा मुंडा आहेत आणि दुसरीकडे स्वत:ला स्वातंत्र्यवीर म्हणवून घेणारे सावरकर आहेत, ज्यांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली. अंदमान तुरुंगातील शिक्षा कमी करण्यासाठी त्यांनी अनेकवेळा माफीची पत्रे इंग्रज सरकारला लिहिली.’ राहुल गांधींच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापले असून भाजपने राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

राहुल गांधींना अटक करा! रणजित सावरकरांचे पोलिसांना पत्र

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी दादरमधील शिवाजी पार्क पोलिसांना पत्र लिहून तक्रार केली आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी केली असून त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करुन त्यांना त्वरित अटक करुन त्यांच्यावर खटला दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in