शिवसेना शिंदे गटाला विदर्भात १५, तर राज्यात १०० जागांची अपेक्षा; शिंदे समर्थक आमदाराचा दावा

शिवसेना समर्थक अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेनेला विदर्भात किमान १५ आणि राज्यात १०० विधानसभा जागा मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
शिवसेना शिंदे गटाला विदर्भात १५, तर राज्यात १०० जागांची अपेक्षा; शिंदे समर्थक आमदाराचा दावा

भंडारा : वैनगंगा नदीवरील जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये तब्बल ५४७ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन केलं जाणार आहे. दरम्यान शिवसेना समर्थक अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेनेला विदर्भात किमान १५ आणि राज्यात १०० विधानसभा जागा मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी आपलं लक्ष विधानसभा निवडणूकीवर केंद्रीत केलं आहे. खासकरून महायुतीत कोणता पक्ष किती जागा लढवणार, याबाबत दररोज विविध दावे करण्यात येत आहेत. महायुतीमधील प्रमुख घटकपक्ष असलेला भाजप १५५ जागा, शिवसेना शिंदे गट ६५ जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला ५५ जागा दिल्या जाऊ शकतात, अशा बातम्या काल माध्यमांमध्ये सुरु होत्या. दरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भंडारा दौऱ्याच्या पाश्वभूमीवर शिंदे समर्थक अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेना शिंदे गटाला राज्यात १०० जागा मिळतील, अशी आशा व्यक्त केली आहे.

नेमकं काय म्हणाले भोंडेकर?

सध्या अपक्ष आमदार असलो तरी भविष्यात शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवायची की पुन्हा अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे जायचं हे कार्यकर्त्यांशी बोलून ठरवू, असे भोंडेकर म्हणाले. आज भंडारामध्ये ज्या विकास कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री करत आहे, त्यामध्ये गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरवर जल पर्यटनाचा अत्यंत महत्त्वकांक्षी प्रकल्पही आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल, असं ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in