
महाराष्ट्रामध्ये सत्तानंतर झाले आणि एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेपासून वेगळे होऊन राज्यात भाजपसोबत युती करत सत्ता स्थापन केली. त्यानंतर खरी शिवसेना कोणाची? हा वाद चांगलाच रंगला. त्यानंतर अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकांपूर्वी निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह तात्पुरते गोठवले. त्यांनतर ठाकरे गट आणि शिंदे गटांना वेगळे नाव आणि चिन्ह देण्यात आले. आता या वादावर येत्या १२ डिसेंबरला निवडणूक आयोगापुढे पहिली सुनावणी होणार आहे.
शिवसेना पक्षातून शिंदे गट बाहेर पडल्यानंतर पक्षाचे नाव आणि चिन्ह दोन्हीवर दावा केला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाने न्यायालयात धाव घेत निवडणूक आयोगाला पक्षचिन्हाबाबत कोणताही निर्णय घेण्यापासून रोखावे अशी मागणी केली होती. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली. ८ ऑक्टोबरला निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्हे गोठवले. २३ नोव्हेंबरपर्यंत निवडणूक आयोगाने दोन्ही गटांची लिखित कागदपत्रे मागवून घेतली होती. त्यामध्येही निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे. आता ९ डिसेंबर पर्यंत लिखित कागदपत्रे सादर करण्यात येणार आहेत.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांना दोन वेगळी नवे आणि चिन्हे देण्यात अली होती. या निर्णयानुसार उद्धव ठाकरे गटाला धगधगती मशाल तर शिंदे गटाला ढाल-तलावर हे चिन्ह देण्यात आले होते. मात्र, धनुष्यबाण निवडणूक चिन्हावरील वाद निवडणूक आयोगासमोर प्रलंबितच आहे. त्यामुळे आता १२ तारखेला याबाबत पहिली सुनावणी होणार असून न्यायालयाचा काय निर्णय होईल? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.