
मुंबई: लोकसभा निवडणूकांनंतर आता राज्यात 26 जून रोजी विधानपरिषदेच्या चार जागांसाठी मतदान होत आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघ, मुंबई पदवीधर मतदारसंघ, नाशिक शिक्षक मतदारसंघ आणि कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान या चारही मतदासंघात शिवसेना ठाकरे गटानं आपले उमेदवार जाहीर केल्यानं काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आज सकाळी उद्धव ठाकरे यांनी या प्रश्नावर दिल्लीतील काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी फोनवरून चर्चा झाली असून आम्ही एक समझौता करत आहोत,असं म्हटलं होतं. आता संजय राऊत यांनी कोकण पदवीधर मतदारसंघातून माघार घेतली असून ही जागा काँग्रेसला देण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेस उमेदवाराला शिवसेना उबाठा पाठिंबा देणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचप्रमाणे काँगेसनंही नाशिक शिक्षक मतदारसंघातून माघार घेतली असून तिथं ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
"कोकण पदवीधरची जागा ही काँग्रेसला मिळतीये. काल रात्री आमची याबाबत चर्चा झाली. त्यात नाना पटोले देखील सहभागी होते. प्रत्येक चर्चेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणलंच पाहिजे, असं नाही. आम्ही त्यांच्या सूचनेनुसार आम्ही काम करतो. आम्ही किशोर जैन यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यांनी त्यानुसार तयारीही केली होती. पण काल असं ठरलं की, कोकणच्या जागेवरून आम्ही आमच्या उमेदवारानं माघार घ्यावी. नाशिकच्या शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसनं माघार घ्यावी. " असं संजय राऊत म्हणाले.
ती आमची परंपरागत जागा...
"नाना पटोले हे खूप मोठे नेते आहेत. ते यापेक्षा मोठे नेते व्हावेत. ते आमचे मित्र आहेत. चार विधानपरिषदेच्या जागा आहेत. मुंबईचा पदवीधर मतदार संघ गेली 40 वर्षे शिवसेना जिंकते आहे. ती आमची परंपरागत जागा आहे. मुंबईतला पदवीधर मतदारसंघ हा शिवसेनेचाच आहे. इथं चर्चेचा फार प्रश्न निर्माण होत नाही. नाशिक पदवीधर मतदारसंघ आमची सीटिंग जागा आहे, असे म्हणत या जागेवर फार चर्चा करून उमेदवारी द्यायची गरज नव्हती," असंही संजय राऊत म्हणाले.
एक समझोता आम्ही करतोय....
आज सकाळी मुंबई पदवीधर मतदारसंघाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अनिल परब यांचा संकल्पनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, "महाविकास आघाडीत बिघाड झालेला नाही. ही गोष्ट खरी आहे की, थोडासा विसंवाद झाला. कारण मी सुद्धा निवडणूक झाल्यानंतर सात-आठ दिवस बाहेर गेलो होतो. दरम्यानच्या काळात तारखा जवळ आल्या होत्या. त्याच्यामुळं सर्व पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले. आज कोकण आणि नाशिकच्या बाबतीत जसं दिल्लीतील काँग्रेस श्रेष्ठींनी मला आणि संजय राऊतांना फोन करून सांगितलं. त्यामुळं एक समझौता आम्ही करतोय. थोड्या वेळात तुम्हाला तो कळेल. निवडणूक झाल्यानंतर मी इथं नव्हतं. निवडणूकीचे अर्ज भरण्याची वेळ टळू नये, म्हणून कधीही अर्ज न भरण्यापेक्षा अर्ज भरून ठेवणं चांगलं, म्हणून आम्ही ते भरले होते."