
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. शुक्रवारी यामध्ये शिवसेना नेते आदित्य ठाकरे नांदेडमध्ये सहभागी झाले होते. शिवसेनेने काँग्रेसच्या या भारत जोडो यात्रेला पाठिंबा दिला आहे. यावेळी त्यांनी, देशातील संविधान आणि लोकशाही धोक्यात आहे. याविरोधात लढण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून भारत जोडो यात्रेत आम्ही एकत्र आलो आहोत, असे ट्विट त्यांनी केले.
"भारत जोडो यात्रेला प्रतिसाद चांगला आहे. माझ्यासोबत अनेक शिवसैनिक यात्रेत सहभागी झाले आहेत. सध्या राज्यात घटनाबाह्य सरकार आहे. खासदार संजय राऊत यांच्या जामिनावरील निकालपत्रावरून सरकारी यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे दिसते. देशात लोकशाही उरली नाही. राज्य सरकारला शिवी देणार मंत्री अब्दुल सत्तार चालतात, बंदूक काढणारे चालतात." अशी टीका यावेळी आदित्य ठाकरे यांनी केली.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासोबत काँग्रेस नेते विश्वजित कदमदेखील यात्रेत सहभागी झाले होते. रस्त्यावर ठिकठिकाणी पारंपरिक वेशभूषा केलेल्या नागरिकांनी वाद्ये वाजवत यात्रेचे स्वागत केले. खास लातूर येथून आणलेला गजराज ही यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. यात्रेत शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबन थोरात, माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते. हिंगोली जिल्हा सीमेवर यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.