
मुंबई : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे स्वतःचा बचाव करण्यासाठी धडपडत असताना धनंजय मुंडे यांना आणखी एक धक्का बसला आहे. घरगुती हिंसाचारप्रकरणी करुणा शर्मा यांनी दाखल केलेल्या तक्रारीची दखल घेत कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश ए. बी. जाधव यांनी धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा यांना दरमहा १ लाख २५ हजाराची पोटगी व मुलगी शिवानी हिला ७५ हजार रुपये दरमहा देण्याचे आदेश दिले.
मुंडे यांच्या पहिल्या पत्नी करुणा मुंडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवरून पुराव्यांची पडताळणी करत धनंजय मुंडे यांना वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. खटला सुरू झाल्यापासून ही रक्कम करुणा मुंडे आणि मुलगी शिवानी यांना देण्यात यावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तसेच खटला सुरू असेपर्यंत कौटुंबिक वादविवाद टाळा, असे निर्देशही न्यायालयाने धनंजय मुंडे यांना दिले आहेत.
मंत्री धनंजय मुंडे यांच्या आपण पहिल्या पत्नी असल्याचा दावा करुणा शर्मा यांनी केला होता, तो न्यायालयाने पुराव्याअंती मान्य केला. करुणा शर्मा आणि त्यांच्या मुलांसोबत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ची कबुली धनंजय मुंडे यांनी दिली होती. करुणा शर्मा-मुंडे यांनी मंत्री मुंडे यांच्याविरोधात वांद्रे कौटुंबिक न्यायालयात घरगुती हिंसाचाराबाबत याचिका दाखल केली होती. मंगळवार, ४ फेब्रुवारी रोजी या याचिकेवर सुनावणी पार पडल्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला.
करुणा शर्मा यांनी केलेले आरोप कौटुंबिक न्यायालयाने मान्य केले आहेत. करुणा शर्मा या पोटगीसाठी पात्र असून त्यांना महिन्याला एक लाख २५ हजार रुपये पोटगी द्यावी, तर मुलगी शिवानीला तिच्या लग्नापर्यंत महिन्याला ७५ हजार रुपये द्यावे, असे आदेश कौटुंबिक न्यायालयाने दिले आहेत.
मात्र, न्यायालयाने धनंजय मुंडे यांच्याबाबत कोणताही अंतिम निष्कर्ष काढलेला नाही. अर्जदार करुणा शर्मा व त्यांची मुलगी शिवानी यांची सध्याची आर्थिक परिस्थिती व अन्य निकषांच्या आधारे त्यांना अंतरिम देखभालीसाठी मिळून दोन लाख रुपये (अर्जदार क्र. १ यांना १.२५ लाख, तर अर्जदार क्र. ३ यांना ७५ हजार रुपये) प्रति महिना पोटगी म्हणून देण्याचा अंतरिम निर्णय न्यायालयाने दिला आहे.
मात्र, धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांच्या अनुषंगाने किंवा कौटुंबिक हिंसाचाराच्या आरोपांवर न्यायालयाने काहीही निर्णय अद्याप दिलेला नाही. याबाबत काही माध्यमांवर दाखविण्यात येत असलेले वार्तांकन निराधार आहे, असे धनंजय मुंडे यांच्या वकील ॲड. सायली सावंत यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे सांगितले.
कराडने जिल्हाधिकाऱ्यांसमोर मला मारहाण केली - करुणा शर्मा
वाल्मिक कराडने मला जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या कक्षात त्यांच्यासमोर मारहाण केली. यावेळी त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी गुरुवारी करुणा शर्मा यांनी केली. मला धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी म्हणून कोर्टाने मान्यता देत पोटगी दिली आहे. करुणा धनंजय मुंडे नावासाठी मी मोठी किंमत चुकवली. यापुढे मला करुणा शर्मा नाही, तर करुणा धनंजय मुंडे म्हणावे, असे आवाहनही त्यांनी केले.
सिशीव मुंडेने घेतली वडिलांची बाजू
‘मी सिशीव धनंजय मुंडे, मला आता बोलणे भाग आहे, कारण माध्यमांनी आमच्या कुटुंबाला मनोरंजनाचा विषय बनवले आहे. माझा बाप जगातला सर्वोत्कृष्ट बाप नसला तरी तो आम्हा भावंडांना कधीही हानिकारक नव्हता. माझी आई कायम तिच्या अनेक कारणांमुळे बाधित असायची आणि त्याचा वचपा ती आम्हाला वेदना देऊन काढायची. घरात हिंसाचार तिच्यासोबत झाला, असा दावा ती करते, तो घरेलू हिंसाचार खर तर मी, माझी बहीण व माझे वडील यांच्यासोबत तिच्याकडून व्हायचा. तिच्याकडून होणारा शारीरिक व मानसिक जाच असह्य झाल्यानंतर वडील तिला सोडून गेले. सन २०२० पासून माझे वडील आमची सर्वस्वी काळजी घेत आहेत. माझ्या आईला कोणतीही आर्थिक अडचण नाही, तरीसुद्धा तिने घराचे कर्जाचे हप्ते न भरण्याचे जाणीवपूर्वक ठरवले आणि माझ्या वडिलांचा बदला घेण्यासाठी कायम खोट्यानाट्या गोष्टी ती पसरवत असते. त्यामुळे घरातील हिंसाचार खरेतर तिच्याकडून व्हायचा’, अशी पोस्ट धनंजय मुंडे यांचा १८ वर्षांचा मुलगा सिशीव धनंजय मुंडे याने केली आहे.