अहिल्यानगरमध्ये ठाकरे सेनेला धक्का; माजी नगरसेवकांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत इनकमिंग सुरूच असून अहिल्यानगर महापालिकेतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतील माजी नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधले.
अहिल्यानगरमध्ये ठाकरे सेनेला धक्का; माजी नगरसेवकांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
एक्स @mieknathshinde
Published on

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत इनकमिंग सुरूच असून अहिल्यानगर महापालिकेतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतील माजी नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधले. शिवसेना मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अहिल्यानगर महापालिकेतील माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हा मोठा झटका आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

आगामी मुंबई महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकीआधी पक्षप्रवेशाचे संकेत मिळत आहेत. या सेनेतून त्या सेनेत, या राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असे पक्ष प्रवेश होतच राहणार आहेत. मात्र एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची अडीच वर्षांपूर्वी स्थापन केली त्यावेळेपासून शिंदेंच्या शिवसेनेत इनकमिंग जोरात सुरू आहे. मुंबई महापालिकेतील ठाकरेंच्या शिवसेनेच्या ४० हून अधिक माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, समाजवादी पक्षातील एकूण ७० हून अधिक माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची ताकद वाढतच आहे.

अहिल्यानगर महापालिकेतील उबाठा गटाचे माजी नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यात माजी नगरसेवक दीपक खैरे, माजी स्थायी समिती सभापती दत्ता बाबाराव जाधव, माजी नगरसेवक प्रशांत बाळू गायकवाड, महिला अंबिका बँकेच्या अध्यक्ष शोभना चव्हाण, माजी नगरसेवक आणि शहरप्रमुख दिलीप नानाभाऊ सातपुते यांचा समावेश आहे.

यावेळी शिवसेना सचिव आणि उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, पुण्यश्लोक अहिल्या नगरचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे आणि शहरप्रमुख अजित दळवी उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in