
मुंबई : मागील सरकारमधील सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, तानाजी सावंत तसेच छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांचा पत्ता कट करत फडणवीसांच्या सरकारमध्ये धक्कातंत्राचा वापर करत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. २३ नोव्हेंबरला निकाल लागल्यानंतर तब्बल २३ दिवसांनी मंत्रिमंडळ विस्ताराचे घोडे अखेर गंगेत न्हाले. आता महायुतीच्या नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन उपमुख्यमंत्री आणि ३९ मंत्री अशी एकूण ४२ जणांची टीम असणार आहे.
राज्यात महायुतीची सत्तास्थापन झाली असून रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. यात भाजपचे १९, शिंदेंच्या शिवसेनेच्या ११ तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर महायुतीच्या सहा आमदारांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, नागपूर येथील राजभवनात रविवारी महायुतीतील मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला. तब्बल ३३ वर्षांनंतर राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधी करण्यात आला. यापूर्वी २१ डिसेंबर १९९१ रोजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळाचा नागपुरात विस्तार झाला होता.
२३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानात पार पडला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली रविवार १५ डिसेंबर रोजी महायुतीतील नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा नागपूर येथील राजभवनात पार पडला. आता रविवारी नागपूरमध्ये झालेल्या मंत्रिमडळ विस्तारावेळी भाजपकडून सर्वप्रथम भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून हसन मुश्रीफ यांनी तर शिवसेना शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील यांनी पहिल्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात ४ लाडक्या बहिणींना संधी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे, आदिती तटकरे यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. तर, मेघना बोर्डीकर आणि माधुरी मिसाळ हे दोन नवे चेहरे मंत्रिमंडळात आले आहेत.
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात यंदा तिन्ही पक्षांनी नव्या चेहऱ्यांना प्राधान्याने संधी दिली आहे. त्यामध्ये, भाजपने साताऱ्यातून शिवेंद्रराजे भोसले तर कणकवलीतून नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांना संधी दिली आहे. त्याचबरोबर शिवसेनेने माजी मंत्री रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांना पहिल्यांदाच मंत्रिपद दिले आहे.
४ लाडक्या बहिणींना संधी
महायुती सरकारमध्ये ४ लाडक्या बहिणींना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले असून भाजपकडून ३ आणि राष्ट्रवादीकडून एका महिला नेत्याने रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. शिवसेना शिंदे गटाकडून एकाही महिला नेत्याला मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. भाजपने पर्वती मतदारसंघातून विजयी झालेल्या माधुरी मिसाळ तसेच परभणी जिल्ह्यातील जिंतूर मतदारसंघातून विजयी झालेल्या मेघना बोर्डीकर यांना राज्यमंत्रिपदाची शपथ दिली आहे. तसेच विधान परिषदेवर असलेल्या पंकजा मुंडे यांना भाजपने थेट कॅबिनेट मंत्रिपद दिले आहे. तसेच उद्धव ठाकरे आणि त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेल्या राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे या पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रीपदी रुजू होणार आहेत.
या आमदारांना मंत्रिपद
भाजप (१९)
नितेश राणे
शिवेंद्रराजे भोसले
चंद्रकांत पाटील
पंकज भोयर (राज्यमंत्री)
मंगलप्रभात लोढा
गिरीश महाजन
जयकुमार रावल
पंकजा मुंडे
राधाकृष्ण विखे पाटील
गणेश नाईक
मेघना बोर्डीकर (राज्यमंत्री)
अतुल सावे
जयकुमार गोरे
माधुरी मिसाळ (राज्यमंत्री)
चंद्रशेखर बावनकुळे
संजय सावकारे
अशोक उईके
आकाश फुंडकर
आशिष शेलार
शिवसेना (११)
उदय सांमत
प्रताप सरनाईक
शंभूराज देसाई
योगेश कदम (राज्यमंत्री)
आशिष जैस्वाल (राज्यमंत्री)
भरत गोगावले
प्रकाश आबिटकर
दादा भुसे
गुलाबराव पाटील
संजय राठोड
संजय शिरसाट
राष्ट्रवादी (९)
आदिती तटकरे
बाबासाहेब पाटील
दत्तात्रेय भरणे
हसन मुश्रीफ
नरहरी झिरवाळ
मकरंद पाटील
इंद्रनील नाईक (राज्यमंत्री)
धनंजय मुंडे
माणिकराव कोकाटे
३३ वर्षांनी नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार
१९९१ नंतर पहिल्यांदा नागपूरमध्ये शपथविधी सोहळा झाला. त्यानंतर तब्बल ३३ वर्षांनी महायुतीचा शपथविधी सोहळा रविवंारी नागपूर येथील राजभवनात पार पडला.
खातेवाटप दोन-तीन दिवसांत - फडणवीस
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून रविवारी आमच्या ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली, ज्यात ६ राज्यमंत्री आहेत. आजपासून आम्ही गतीशील कारभार सुरू केला आहे. येत्या २-३ दिवसांत आम्ही खातेवाटप जाहीर करू. चांगले कामकाज करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
या मंत्र्यांना डच्चू
भाजपमधून सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण तसेच शिंदे गटातून अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील या बड्या नेत्यांना कॅबिनेट विस्तारात कोणतेही स्थान देण्यात आलेले नाही.
२० नव्या चेहऱ्यांना संधी
भाजपने नितेश राणे, माधुरी मिसाळ, जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले, मेघना बोर्डीकर, पंकज भोयर, आकाश फुंडकर, अशोक उईके आणि संजय सावकारे यांना पहिल्यांदा मंत्रिपदाची संधी दिली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून प्रताप सरनाईक, भरत गोगावले, योगेश कदम, प्रकाश आबिटकर, संजय शिरसाट आणि आशिष जैस्वाल हे नवे चेहरे असतील. राष्ट्रवादीने नरहरी झिरवाळ, मकरंद जाधव पाटील, बाबासाहेब पाटील आणि इंद्रनील नाईक या नव्यांना संधी दिली आहे.