धक्कादायक, पण पक्ष एकसंध राहील! पृथ्वीराज चव्हाण यांचा विश्वास

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. मात्र, त्यांनी त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही.
धक्कादायक, पण पक्ष एकसंध राहील!  पृथ्वीराज चव्हाण यांचा विश्वास

कराड : अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. मात्र, त्यांनी त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर जास्त बोलणे योग्य नाही. नेते गेले तरीही कार्यकर्ते, मतदार, सामान्य जनता पक्षासोबत राहील. त्यामुळे चिंतेचे कारण नाही. आम्ही लढू आणि जनतेच्या न्यायालयात जाऊ, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर आमदार पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधून पक्षाची भूमिका मांडली. यावेळी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांच्यासह आ. अमिन पटेल, माजी मंत्री नसीम खान उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, ‘‘अशोक चव्हाण यांनी पुढची रणनीती जाहीर केली नसली तरी त्यांची दिशा स्पष्ट आहे. त्याबद्दल भाजपच्या नेतृत्वाकडून बऱ्याच दिवसांपासून सुतोवाच होत होतं. आज आम्ही बाळासाहेब थोरात आणि इतर सहकाऱ्यांनी काँग्रेसच्या विधिमंडळ सदस्यांशी संपर्क केला आहे. येत्या मंगळवारी आणि बुधवारी राज्यसभेची उमेदवारी भरण्याच्या वेळेला विधिमंडळ पक्षाची बैठक घेतली जाईल. या सर्व परिस्थितीत आम्ही ज्या-ज्या विधिमंडळ सदस्य आणि नेत्यांशी संपर्क साधलेला आहे, त्यातील कुणीही जाणार नाही. भाजपकडून मुद्दाम वावड्या उठवल्या जात आहेत. नावं घेतली जात आहेत. पण, त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये,’’ असे आवाहनही चव्हाण यांनी केले.

logo
marathi.freepressjournal.in