Video : अचानक गणपत गायकवाड उठतात अन्...; हिल लाईन पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज समोर

पोलीस स्टेशनच्या दरवाजामध्ये माझ्या मुलाला धक्काबुक्की करण्यात आली. या लोकांनी माझ्या जागेवर जबरदस्तीने कब्जा केला होता. या सर्व गोष्टीचा मनस्ताप झाला म्हणून मी गोळीबार केला. मला केलेल्या कृत्याचा काही पश्चाताप...
Video : अचानक गणपत गायकवाड उठतात अन्...; हिल लाईन पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज समोर

उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस ठाण्यात कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर चौकशीचे आदेश दिले आहेत. आता या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

काय आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये?

समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये गणपत गायकवाड हे महेश गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांसोबत पोलीस ठाण्यात बसलेले दिसत आहेत. यावेळी त्यांच्यात काहीतरी चर्चा होत आहे. एवढ्यात गणपत गायकवाड अचानक उठून, पिस्तूल काढतात आणि महेश गायकवाड यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर गोळ्या झाडतात. गणपत गायकवाड यांनी गोळ्या झाडायला सुरुवात करताच महेश आणि त्यांचे साथीदार तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र, त्यात ते अपयशी ठरतात. यानंतर गणपत गायकवाड महेश गायकवाड यांच्याजवळ जात त्यांना मारहाण करतात. पोलिसांना याबाबत कळताच पोलीस अधिकारी धावत येतात आणि हस्तक्षेप करून गणपत गायकवाड यांना रोखतात.

आमदार गणपत गायकवाड यांना अटक-

गणपत गायकवाड यांनी आपल्या कृत्याची कबुलीही दिली असून या प्रकरणी पोलिसांनी आमदार गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे. हिल लाईन पोलीस स्टेशनअंतर्गत द्वार्ली गावातील जमिनीच्या ताब्यावरून हा वाद असून शुक्रवारी रात्री १०.३० ते ११ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.

माझ्यासमोर पर्याय नव्हता-

पोलीस स्टेशनच्या दरवाजामध्ये माझ्या मुलाला धक्काबुक्की करण्यात आली. या लोकांनी माझ्या जागेवर जबरदस्तीने कब्जा केला होता. या सर्व गोष्टीचा मनस्ताप झाला म्हणून मी गोळीबार केला. मला केलेल्या कृत्याचा काही पश्चाताप नाही. माझ्या मुलांना पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांसमोर मारहाण होत होती. त्यामुळे माझ्यासमोर पर्याय नव्हता. पोलिसांनी हिंमत करून मला अडवले. मात्र त्यांना जिवे मारण्याचा माझा हेतू नव्हता. पण पोलिसांसमोर माझ्यावर जर कुणी हल्ला करत असेल तर माझ्या आत्मसंरक्षणासाठी असे करणे गरजेचे होते, माझ्या मुलासाठी मी हे सगळे केले, कोणी माझ्या मुलालाच मारत असेल तर मी हे सहन करू शकत नाही. एक बाप म्हणून मी हे केले आहे, असे गणपत गायकवाड म्हणाले. तसेच, मला होत असलेल्या त्रासाबाबत भाजपामधील वरिष्ठांना आधीच कल्पना दिली होती, असेही त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in