धक्कादायक! घरातील वायफाय राऊटरचा स्फोट, कल्याणमध्ये तिघे गंभीर जखमी

याप्रकरणी डोंबिवलीतील टिळकनगर पोलिसांनी राजू म्हात्रे नावाच्या इंटरनेट ऑफरेटरविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.
धक्कादायक! घरातील वायफाय राऊटरचा स्फोट, कल्याणमध्ये तिघे गंभीर जखमी
Published on

आज अनेक घरात किंवा कार्यालयात इंटरनेटसाठी वायफाय राऊटरचा वापर केला जातो. कल्याणमधील अशाच एका घरात वायफाय राऊटरचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. कल्याणमधील न्यू गोविंदवाडी परिसरातील रामदेव चौधरी चाळीत राहणाऱ्या सायमा शेख यांच्या घरात परवा संध्याकाळी सहा वाजता ही घटना घडली. या घटनेत सायमा यांची दहा वर्षाची मुलगी नाजमीन शेख,तसेच यांच्या शेजारच्या घरात राहणाऱ्या नगमा अन्सारी आणि नगमा यांचा तीन महिन्यांचा मुलगा अरमान अन्सारी हे गंभीररित्या भाजले आहेत. याप्रकरणी डोंबिवलीतील टिळकनगर पोलिसांनी राजू म्हात्रे नावाच्या इंटरनेट ऑफरेटरविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगमा अन्सारी असे राऊटरच्या स्फोटात जखमी झालेल्या महिलेचे नाव असून या स्फोटात ती ८० टक्के भाजली आहे. तिच्यावर नवी मुंबईतील बर्न रुग्णायलात उपचार सुरु आहेत. या घटनेत नगमा यांच्यासह त्यांचा तीन महिन्यांचा मुलगा अरमान अन्सारी ५० टक्के भाजला आहे. तर सायमा शेख यांची मुलगी दहा वर्षीय नाजमीन शेख हिचा चेहरा आणि दोन्ही हात भाजले आहेत. त्यांच्यावर कल्याणमधील मीरा रुग्णालयात रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

यात दुर्घटनेत जखमी झालेल्या मुलीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्यावेळी मोठा स्फोट झाला. इंटरनेटची वायर ही विजेच्या मीटरला लागून होती. तर जखमी नगमा अन्सारी यांचे पती अतिक अन्सारी यांनी सांगिलले की, विजेच्या मीटरला लागूनच वायफाय इंटरनेटवायर बसवण्यात आली होती. त्यामुळे एवढी मोठी दुर्घटना घडली. यावेळी पेटीच्या आतून जोरदार ज्वाळा निघत असल्याचेही ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in