परिवर्तन झाले असेल, तर देशात उजव्या शक्तींचे सरकार सत्तेत कसे आले? ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांचा सवाल

देशात परिवर्तन झाले असेल, तर उजव्या शक्तींचे सरकार सत्तेत कसे आले, असा सवाल ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी उपस्थित केला. परिवर्तनवादी चळवळीतील विचारवंत आणि कार्यकर्ते आत्मपरीक्षण करीत नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. परिवर्तनवाद्यांनी स्वतःच्या दोषांचेही आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
परिवर्तन झाले असेल, तर देशात उजव्या शक्तींचे सरकार सत्तेत कसे आले? ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांचा सवाल
परिवर्तन झाले असेल, तर देशात उजव्या शक्तींचे सरकार सत्तेत कसे आले? ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांचा सवालसंग्रहित छायाचित्र
Published on: 

छत्रपती संभाजीनगर : देशात परिवर्तन झाले असेल, तर उजव्या शक्तींचे सरकार सत्तेत कसे आले, असा सवाल ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी उपस्थित केला. परिवर्तनवादी चळवळीतील विचारवंत आणि कार्यकर्ते आत्मपरीक्षण करीत नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. परिवर्तनवाद्यांनी स्वतःच्या दोषांचेही आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

निळे प्रतीक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील तापडिया नाट्यमंदिरात आयोजित पहिल्या राज्यस्तरीय परिवर्तनवादी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून डॉ. सबनीस बोलत होते. या संमेलनाचे उद्घाटन सामाजिक न्यायमंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते रविवारी (१८ ऑक्टोबर) झाले.

या वेळी स्वागताध्यक्ष ॲड. रामेश्वर तायडे, उद्योजक चेतन राऊत, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती बालाजी सोनटक्के, धनराज गोंडाणे, डॉ. शिवाजी वाठोरे आणि आयोजक रतनकुमार साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘सत्ता ही भ्रष्ट संकल्पना’

जीवनात संवाद आणि संघर्ष या दोन्ही भूमिका आवश्यक आहेत. त्याचबरोबर आपल्या सामर्थ्याचे आणि मर्यादांचेही मूल्यमापन झाले पाहिजे, असे डॉ. सबनीस म्हणाले. देशात कोणत्याही पक्षाचे सरकार असले, तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा निघत नसेल, तर विचारवंत आणि सरकारचा शहाणपणा कुठे गेला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दुष्काळाच्या काळात सरकारने शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली. मात्र, या रकमेत शिमगाही साजरा होऊ शकत नाही आणि दुसरीकडे सरकार दिवाळी साजरी करण्यास सांगते, अशा शब्दांत त्यांनी मदतीच्या रकमेकडे लक्ष वेधले. सत्तेच्या स्वरूपाचे चिकित्सक मूल्यमापन करून प्रश्नांची सखोल उत्तरे शोधण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

‘समाजसुधारणेची सुरुवात स्वतःपासून करा’

परिवर्तन कशाचे आणि कुणासाठी करायचे, याबाबत स्पष्टता असणे आवश्यक आहे. परिवर्तनाच्या प्रक्रियेत मनाला समाधान मिळाले पाहिजे. अनेक विद्वान समाजापासून अलिप्त राहतात. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, अशी भूमिका घेतल्यामुळे त्यांचे समाजातील अस्तित्व कमी होते. आपले विचार समाजाने सहजपणे स्वीकारले पाहिजेत. काही पुस्तके केवळ स्वप्रसिद्धीसाठी प्रकाशित केली जातात. समाजसुधारणेची सुरुवात स्वतःपासून केली, तरच खऱ्या अर्थाने परिवर्तन घडेल, असे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.

‘प्रश्न विचारणे गुन्हा ठरले’

सध्याच्या परिस्थितीत प्रस्थापित व्यवस्थेला प्रश्न विचारणे हा गुन्हा ठरत असल्याचे मत डॉ. शिवाजी वाठोरे यांनी व्यक्त केले. ‘जेन-झी’वर लाठीहल्ला करणे हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण नाही, असेही ते म्हणाले. हक्कांसाठी रस्त्यावर उतरणारे लोक आहेत, तोपर्यंत लोकशाही आणि संविधान जिवंत राहील, असे ॲड. रामेश्वर तायडे यांनी सांगितले. या संमेलनात मान्यवरांच्या हस्ते ‘परिवर्तन पर्व’ या स्मरणिकेसह ‘वन डे मॅरेज’ या नाटकाचे, ‘विद्रोही विचारांचा जागर’ आणि ‘आपली माणसं’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. प्रवीणा कन्नडकर यांनी सूत्रसंचालन केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in