

छत्रपती संभाजीनगर : बँकांनी केलेल्या कथित बेकायदेशीर कारवाईमुळे आपले मोठे आर्थिक आणि वैयक्तिक नुकसान झाल्याचा गंभीर आरोप करत अभिनेता-निर्माता सिद्धार्थ बी. जाजू यांनी न्यायालयीन लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणी त्यांनी पिरामल हाउसिंग फायनान्स विरुद्ध ५० कोटी रुपये आणि आयसीआयसीआय होम फायनान्स विरुद्ध ५ कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईचा दावा दाखल करण्याची तयारी केली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना जाजू यांनी सांगितले की, बँकांच्या कारवाईमुळे माझे केवळ घरच हिरावले गेले नाही, तर सुमारे ५० कोटी रुपयांचे संभाव्य व्यावसायिक उत्पन्न आणि माझा ‘सिबिल’ रेकॉर्डही उद्ध्वस्त झाला. या प्रकरणाचा घटनाक्रम सांगताना त्यांनी नमूद केले की, २०१७ मध्ये आयसीआयसीआय होम फायनान्सने १ कोटी रुपयांची थकबाकी रोखून धरली आणि आवश्यक कागदपत्रे देण्यास नकार दिला. त्यानंतर २०२१ मध्ये पिरामल हाउसिंग फायनान्सने कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या डी-१ आणि डी-२ या दोन बंगल्यांवर ताबा मिळवला. या कारवाईविरोधात न्यायालयात दाद मागितल्यानंतर मे २०२२ मध्ये डीआरटी न्यायालयाने आणि २५ जुलै २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर न्यायालयाने बँकांची कृती बेकायदेशीर ठरवत मालमत्तेचा ताबा परत देण्याचे आदेश दिले. अखेर जानेवारी २०२६ मध्ये दीर्घ संघर्षानंतर जाजू यांना त्यांच्या मालमत्तेचा ताबा पुन्हा मिळाला.
या संपूर्ण प्रकरणामुळे त्यांचे आर्थिक नियोजन कोलमडल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. २०२१ मध्ये त्यांचा सिबिल स्कोअर ७६५ (उत्कृष्ट) होता आणि त्यांना १० कोटी रुपयांहून अधिक कर्ज मंजूर होण्याची शक्यता होती. त्या निधीतून चित्रपट आणि ओटीटी व्यवसाय उभारून सुमारे ५० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवण्याचा त्यांचा मानस होता. मात्र, बँकांच्या कारवाईमुळे सर्व संधी हुकल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, या प्रकरणातील संबंधित बँक अधिकाऱ्यांची पोलिसांकडून चौकशी सुरू असून, लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.