
पुणे : पुणे महापालिकेचे विभाजन होणे गरजेचे आहे. मात्र, त्यात राजकीय, सामाजिक, भौगोलिक असे अनेक विषय गुंतलेले आहेत. त्यामुळे यावर व्यापक चर्चा अपेक्षित आहे. मात्र, १५ जानेवारीपर्यंत सरकार नियमित कामाला लागले असेल. त्यावेळी प्राधान्याचा विषय हा महापालिकेचे विभाजनच असेल, असे सुतोवाच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. दरम्यान, महापालिका निवडणुका जाहीर होण्याआधीच शक्यतो हा निर्णय होईल, असेही ते म्हणाले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पुणे शहरातील नवनिर्वाचित आमदारांच्या वार्तालापाचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, चेतन तुपे, बापू पठारे, सिद्धार्थ शिरोळे हे या वार्तालापात सहभागी झाले होते. यावेळी पुणे शहरातील विविध प्रश्नांबद्दल आमदार आणि मंत्र्यांनी त्यांचे विचार मांडले.
पाटील म्हणाले, महापालिकेची निवडणूकच नसल्याने नगरसेवक व नागरिक यांच्यात संवाद राहिला नाही. नगरसेवकांची कामे आमदारांना करावी लागत आहेत. मेट्रो, नदी सुधार, ड्रेनेजच्या पाण्याचे शुद्धीकरण प्रकल्प, असे विषय आमदारांशी संबंधित असतात. पुण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट आहे. मुळशी धरणाबाबत सरकार व टाटा कंपनी यांच्यात बोलणी सुरू आहे. आता धरणातून वीज तयार होत नाही. त्यामुळे 'धरणच ताब्यात द्या' अशी आमची मागणी आहे. तसे झाले तर पुण्याच्या पाण्याचा प्रश्न भविष्यातील वाढती लोकसंख्या विचारात घेतली तरी सुटू शकेल, असे ते म्हणाले.
महापालिकेचे विभाजन होणे गरजेचे आहे. मात्र, त्यात राजकीय, सामाजिक, भौगोलिक असे अनेक विषय गुंतलेले आहेत. त्यामुळे यावर व्यापक चर्चा अपेक्षित आहे. नावांचा प्रश्न अशा वेळी अतिशय महत्त्वाचा ठरतो. त्यातही पुणे नावाला इतिहास आहे. त्यामुळे पुणे नावाचा समावेश असलाच पाहिजे, याबाबत सगळेच आग्रही असणार. अशा अनेक गोष्टींचा साधकबाधक चर्चा झाल्यानंतरच महापालिकेच्या विभाजनाचा निर्णय होईल, असे पाटील यांनी सांगितले.
नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, पुण्याचा झपाट्याने होणारा विकास आपण पाहतोय. त्यासाठी आपण भविष्यासाठी योग्य नियोजन करत आहोत. पुण्याचा विकास २०५० पर्यंत नियोजनबद्ध झालेला असेल. समाविष्ट गावांचाही प्रश्न असून, तेथेही योग्य पायाभूत सुविधा उभ्या करणार आहोत. आमदार चेतन तुपे म्हणाले, "वाहतुकीच्या समस्येवर सार्वजनिक प्रवासी वाहतुकीसाठी मेट्रोचे जाळे वाढविणे हा उपाय आहे. आमचे त्याकडे लक्ष आहे."
आमदार भीमराव तापकीर म्हणाले, वाहतुकीच्या कोंडीने संपूर्ण शहर त्रस्त आहे. त्यासाठीच मी येत्या ५ वर्षांत स्वारगेट ते खडकवासला या मेट्रोसाठी प्रयत्नशील आहे.
आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, मतदारसंघातील बसस्थानकाचा प्रश्न कालच आम्ही सोडवला आहे. तसेच वाहतूक प्रश्न गंभीर होत आहे. मेट्रोमुळे देखील वाहतुकीवरील बराचसा ताण कमी होऊ लागला आहे.
आमदार बापू पठारे म्हणाले, पुण्याचा विस्तार प्रचंड होत आहे. तो कुठेतरी मर्यादित करायला हवा. पुणे वाढत असल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. रिंगरोडच्या बाहेर पुण्याची हद्द वाढणार नाही, असे काही धोरण करायला हवे. आपण ठोस भूमिका घेतली नाही, तर पुणे वाढतच राहील.