आवाडेंचे बंड झाले थंड; मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी धैर्यशील मानेंना दिलासा

शिंदे गटाच्या शिवसेनेचे धैर्यशील माने यांच्यावर भाजपचे नेते नाराज आहेत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला भाजपने विरोध केला होता. या जागेवर भाजपही आग्रही होती. त्यामुळे आमदार प्रकाश आवाडे, विनय कोरे यांचीही नावे चर्चेत होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्याच नावाचा आग्रह धरला.
आवाडेंचे बंड झाले थंड; मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी
धैर्यशील मानेंना दिलासा

विशेष प्रतिनिधी/मुंबई

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात भाजपसोबत असलेले अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे शिंदे गटाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांची अडचण वाढणार होती. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी कोल्हापुरात जाऊन आधी आवाडे यांची भेट घेतली आणि त्यांची समजूत काढली. त्यामुळे आवाडे यांनी अखेर माघार घेतली. त्यामुळे माने यांना दिलासा मिळाला आहे. माने हे हातकणंगले मतदारसंघातील विद्यमान खासदार असून, शिंदे गटाने त्यांनाच उमेदवारी दिली आहे. येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरुडकर यांचे आव्हान आहे.

शिंदे गटाच्या शिवसेनेचे धैर्यशील माने यांच्यावर भाजपचे नेते नाराज आहेत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला भाजपने विरोध केला होता. या जागेवर भाजपही आग्रही होती. त्यामुळे आमदार प्रकाश आवाडे, विनय कोरे यांचीही नावे चर्चेत होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्याच नावाचा आग्रह धरला. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे प्रकाश आवाडे नाराज होते. त्यासाठीच त्यांनी माने यांच्या विरोधात दंड थोपटले होते. त्यातून माने यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती. माने यांच्यावर महायुतीतील शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरही नाराज आहेत. त्यांनीदेखील आवाडे यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. तसेच विनय कोरे यांचीही त्यांनाच साथ मिळत होती. याचा फटका माने यांना बसण्याची शक्यता होती. मात्र, हे बंड थंड करण्यात मुख्यमंत्र्यांना यश आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शंभुराज देसाई, रामदास कदम आदी नेते आज सकाळी आमदार प्रकाश आवाडे यांच्या निवासस्थानी पोहोचले. या नेत्यांनी आवाडे यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्री गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्याशी संवाद साधत आहेत. मात्र, ते आपल्या भूमिकेवर ठाम होते. आज सर्वांनी मिळून त्यांची मनधरणी केली, तेव्हा त्यांनी आपली तलवार मॅन केली. त्यानंतर आवाडेसह सर्वच नेते धैर्यशील माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेले. त्यामुळे माने यांना मोठा दिलासा मिळाला. आवाडे यांनी माघार घेतल्याने आता महायुतीचे नेते धैर्यशील माने यांच्यासाठी कामाला लागतील, असे बोलले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात माने यांच्याबद्दल भाजप आणि मित्रपक्षांत नाराजी आहे. त्यामुळे निवडणुकीत त्यांना कितपत साथ मिळते, हे पाहावे लागेल. हातकणंगले मतदारसंघात अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावकर आणि अपक्ष आमदार प्रकाश आवाडे हे माने यांच्या उमेदवारीवर खुश नाहीत. त्याचा काही अंशी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे खासदार आहेत. त्यामध्ये संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांचा समावेश आहे. या दोन्ही विद्यमान खासदारांना शिंदे यांच्या शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. मात्र, या दोघांसमोर महाविकास आघाडीचे तगडे आव्हान आहे. कारण कोल्हापुरात मंडलिक यांच्याविरोधात श्रीमंत शाहू महाराज आणि हातकणंगलेत सत्यजित पाटील सरुडकर यांचे आव्हान आहे. या दोन्ही जागा राखण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in