सिंधुदुर्गच्या आंबा-काजू शेतीला AI ची साथ; आठही तालुक्यांत २ वर्षांचा प्रायोगिक प्रकल्प; उत्पादनवाढीसह बचतीचे उद्दिष्ट

हवामान बदल, अवकाळी पाऊस, तापमानातील चढ-उतार, वाढती आर्द्रता तसेच कीड-रोगांचा प्रादुर्भाव यामुळे आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांसमोरील आव्हाने वाढत असताना सिंधुदुर्गातील फलोत्पादनाला आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे.
सिंधुदुर्गच्या आंबा-काजू शेतीला AI ची साथ; आठही तालुक्यांत २ वर्षांचा प्रायोगिक प्रकल्प; उत्पादनवाढीसह बचतीचे उद्दिष्ट
सिंधुदुर्गच्या आंबा-काजू शेतीला AI ची साथ; आठही तालुक्यांत २ वर्षांचा प्रायोगिक प्रकल्प; उत्पादनवाढीसह बचतीचे उद्दिष्ट'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

सिंधुदुर्गनगरी : हवामान बदल, अवकाळी पाऊस, तापमानातील चढ-उतार, वाढती आर्द्रता तसेच कीड-रोगांचा प्रादुर्भाव यामुळे आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांसमोरील आव्हाने वाढत असताना सिंधुदुर्गातील फलोत्पादनाला आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून ‘सिंधुरत्न समृद्ध’ योजनेंतर्गत जिल्ह्यातील आठही तालुक्यांत कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित स्मार्ट शेतीचा दोन वर्षांचा प्रायोगिक प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

या प्रकल्पात २०० आंबा आणि २०० काजू उत्पादक अशा एकूण ४०० शेतकऱ्यांचा समावेश करण्यात येणार आहे. एआय, इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), उपग्रह तंत्रज्ञान, मृदा सेन्सर्स, स्थानिक हवामान केंद्रे आणि ड्रोन यांच्या माध्यमातून बागांचे डिजिटल व्यवस्थापन केले जाणार आहे. बदलत्या हवामानाचा परिणाम कमी करून उत्पादन आणि उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे सांगण्यात आले. कृषी विभागामार्फत कृषी विज्ञान केंद्र आणि ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती यांच्या माध्यमातून प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या नियोजनातून तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या समन्वयाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात प्रकल्पासाठी ‘डिजिटल वॉर रूम’ उभारण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात डिजिटल डॅशबोर्ड उपलब्ध करून देणार आहे.

मोबाईलवर हवामानाचा अंदाज

प्रकल्पांतर्गत स्थानिक हवामान केंद्रे उभारण्यात येणार असून, तापमान, आर्द्रता आणि पर्जन्यमानाची प्रत्यक्ष वेळेतील माहिती संकलित केली जाईल. मृदा सेन्सर्स आणि आयओटी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जमिनीतील ओलावा व तापमानाची माहिती घेऊन पाणी आणि खत व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले जाईल. हे मार्गदर्शन शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मराठी भाषेत उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in