सिंधुदुर्गवासीयांना धक्का! मुंबई-चिपी विमानसेवा उद्यापासून होणार बंद

मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली मुंबई ते चिपी (सिंधुदुर्ग) व चिपी ते मुंबई ही विमानसेवा शनिवारपासून (२६ ऑक्टोबर) बंद करण्यात येत असल्याने सिंधुदुर्गवासीयांना मोठा धक्का बसला आहे.
सिंधुदुर्गवासीयांना धक्का! मुंबई-चिपी विमानसेवा उद्यापासून होणार बंद
सौजन्य - एक्स : @cbdhage (PC : Sadanand Savardekar/Omkar Subhedar)
Published on

सिंधुदुर्ग : मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली मुंबई ते चिपी (सिंधुदुर्ग) व चिपी ते मुंबई ही विमानसेवा शनिवारपासून (२६ ऑक्टोबर) बंद करण्यात येत असल्याने सिंधुदुर्गवासीयांना मोठा धक्का बसला आहे.

मुंबईहून थेट तळकोकणात जाण्यासाठी चिपी येथे प्रचंड खर्च करून विमानतळ उभारण्यात आले. या विमानसेवेला कोकणवासीयांचा मोठा प्रतिसाद लाभला होता. मात्र, अनियमित सेवेमुळे ही विमानसेवा टीकेचे लक्ष्य ठरली होती.

तीन वर्षांपूर्वी मुंबई ते चिपी व चिपी ते मुंबई अशी ही विमानसेवा सुरू करण्यात आली. सुरुवातीला मोठ्या थाटात दररोज उड्डाणे सुरू करण्यात आली. मात्र, नंतर ही सेवा रखतखडत सुरू राहिली. आता अखेर २६ ऑक्टोबरपासून मुंबई ते चिपी ही विमानसेवा बंद होत आहे. त्यामुळे कोकणवासीयांचे विमानातून आरामात आपले गाव गाठण्याचे स्वप्न पुन्हा एकदा अधुरेच राहणार आहे.

९ ऑक्टोबर २०२१ पासून सिंधुदुर्गातील ‘चिपी’ विमानतळावरून व्यावसायिक उड्डाणे सुरू झाली होती. सिंधुदुर्गात थेट विमानाने जाता येत असल्याने कोकणवासीयांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला होता. पण, या विमानसेवेला अनियमिततेचे ग्रहण लागले. अनेक विमाने अचानक रद्द होऊ लागली. त्याचा फटका प्रवाशांना बसू लागला. मुंबईहून सुटलेले विमान ‘चिपी’ विमानतळावर न उतरता परत मुंबईला परतणे, मुंबई किंवा सिंधुदुर्ग विमानतळावर प्रवासी गेल्यानंतर विमानाचे उड्डाण रद्द होणे आदी प्रकार वारंवार होऊ लागले. या बेभरवशाच्या सेवेमुळे प्रवासी वैतागले.

‘अलायन्स एअर’ या उपकंपनीमार्फत सिंधुदुर्ग (चिपी) ते मुंबई आणि मुंबई ते सिंधुदुर्ग (चिपी) मार्गावर विमानसेवा सुरू होती. मात्र, आता ती बंद होत आहे. त्यामुळे ऐन दिवाळी आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसणार आहे.

तीन वर्षांचा करार संपुष्टात येत असल्याने सेवा बंद होणार

आता पर्यटन हंगामाला प्रारंभ झालेला असतानाच अचानक सिंधुदुर्ग-मुंबई विमानसेवा २६ ऑक्टोबरपासून बंद होणार आहे. ही सेवा तीन वर्षांसाठी करार पद्धतीने सुरू केली होती. ही मुदत येत्या २६ ऑक्टोबर रोजी संपणार आहे. त्यामुळे या प्रवासाची २६ तारखेपासूनची तिकीट विक्री बंद होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in