सिंधुदुर्ग : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. एकीकडे खासदार नारायण राणे यांनी महायुतीतील जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर करत निवडणूक रणनिती स्पष्ट केली असताना, दुसरीकडे भाजपातील राणेविरोधी गटाने या फॉर्म्युलालाच नव्हे तर संपूर्ण महायुती व्यवस्थेलाच उघड विरोध केल्याचे चित्र पहावयास मिळाले. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राजीनामा सत्राला सुरुवात झाली असून, पक्षातील असंतोष उघडपणे बाहेर पडू लागला आहे.
मालवण शहराध्यक्ष बाबा मोंडकर यांच्या राजीनाम्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांचे कट्टर समर्थक, भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष व विद्यमान मंडल अध्यक्ष आनंद (भाई) सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्यासह सुमारे ५० प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घाईघाईने पक्षातील विविध पदांचे राजीनामे सादर केले आहेत.
रविवारी सकाळी खासदार नारायण राणे यांनी महायुतीतील घटक पक्षांमधील जागावाटपाचा फॉर्म्युला अधिकृतरीत्या जाहीर करताच भाजपामध्ये असंतोषाचा उद्रेक झाला आणि तत्काळ राजीनामा सत्र सुरू झाले.भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांना पाठवलेल्या पत्रात आनंद (भाई) सावंत यांनी मंडल अध्यक्षपदाचा राजीनामा देताना, सध्याच्या राजकीय परिस्थितीत या पदावर राहून काम करणे मला उचित वाटत नाही. तरी माझा राजीनामा त्वरित स्वीकारावा, असे स्पष्ट नमूद केले आहे. सावंत यांच्यासोबतच नुकतेच ऊबाठा सेनेतून भाजपात प्रवेश केलेले जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष महेश (छोटू) पारकर, जि.प.चे माजी सभापती लॉरेन्स मानयेकर, जिल्हा व युवा मोर्चा उपाध्यक्ष हार्दिक शिगले यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याची माहिती आहे.
या राजीनामा नाट्यामुळे जिल्हा भाजप आणि संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, येत्या काही दिवसांत मंडल व बूथ पातळीवरील आणखी पदाधिकारी राजीनामे देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.