
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील आंबा-काजू उत्पादक शेतकरी आणि बागायतदारांना पीक विम्याची रक्कम अद्यापही मिळालेली नाही. ही रक्कम ताबडतोब न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हा आंबा-काजू बागायतदार संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांनी दिला आहे.
सध्या हवामान बदल आणि अवकाळी पावसामुळे आंबा-काजू उत्पादक शेतकरी आणि बागायतदार संकटात आहेत. मे-जून महिन्यात पीक विम्याची रक्कम मिळाली असती, तर बागायतींची योग्य निगा राखता आली असती, असे चमणकर म्हणाले.
या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी संघाच्या एका शिष्टमंडळाने नुकतीच जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. या शिष्टमंडळात संघाच्या उपाध्यक्षा दिव्या वायंगणकर, संघाचे सचिव प्रकाश बोवलेकर आदी उपस्थित होते. भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा इशारा दिला. जिल्हा कृषी अधीक्षक नाईकनवरे यांनी संघाच्या शिष्टमंडळाला सप्टेंबर अखेरपर्यंत पीक विम्याची रक्कम बागायतदारांना मिळेल, असे आश्वासन दिले होते; मात्र ऑक्टोबर उजाडला तरी बागायतदारांना ही रक्कम अद्यापही मिळालेली नाही, याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले.
चमणकर यांनी स्पष्ट केले की, विमा कंपनीच्या नियमानुसार जोखीम कालावधी संपल्यानंतर भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना ४५ दिवसांनी मिळणे आवश्यक आहे. चालू वर्षी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली असल्याने ही रक्कम लवकर मिळावी. अन्यथा, आंदोलन करण्याशिवाय आमच्यासमोर पर्याय नाही, असा इशारा बागायतदार संघाने दिला आहे.
तरीही पीक विम्याची रक्कम दिवाळीपूर्वी मिळाली नाही, तर ही दिवाळी कशी साजरी करावी, असा प्रश्न आमच्यापुढे उभा आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
पीक विम्याचा कालावधी वाढवण्याची मागणी
जिल्ह्याचे अर्थकारण प्रामुख्याने आंबा आणि काजू या पिकांवर अवलंबून आहे. दरवर्षी आंबा व काजूचा हंगाम १५ मे नंतरही सुरूच राहतो, तेव्हा या पिकांच्या विम्याचा कालावधी १५ मे ऐवजी ३१ मे असा करण्यात यावा, अशी मागणीही संघाने केली असून, या समस्येकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे.
दिवाळी कशी साजरी करायची?
मागील पाच-सहा वर्षांपासून कोरोना महामारी, निसर्गात होणारे बदल, अवकाळी पाऊस, वादळ यामुळे शेतकरी-बागायतदार पूर्णपणे हतबल झाला आहे. गेल्या पंधरा दिवसांतील पावसामुळे तर झाडांना पालवी फुटली आहे, परिणामी आंबा-काजूला मोहोरही उशिरा येण्याची शक्यता आहे.
शेतकरी अडचणीत
चालू वर्षी हवामानातील बदलांमुळे शेतकरी आणि बागायतदार संकटात असून, सहकारी पतसंस्था, जिल्हा सहकारी बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. काही शेतकरी आणि बागायतदारांना तर जप्तीच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत, त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. हे लक्षात घेऊन पीक विम्याची रक्कम सर्वांना लवकरात लवकर मिळावी, असा संघटनेचा आग्रह आहे.