सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक गावाची सविस्तर माहिती आता लवकरच एका क्लिकवर विकिपीडिया या जागतिक डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तृप्ती जिल्हाधिकारी धोडमिसे यांच्या संकल्पनेतून तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर आणि शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली 'आपलो सिंधुदुर्ग' हा उपक्रम राबवून ही माहिती विकिपीडियावर उपलब्ध केली जाणार आहे.
जिल्ह्यात एकूण ७५८ गावे (७५६ + २-पुनर्वसन गावे) असून या गावांची खरी ओळख जगासमोर आणण्यासाठी हा विशेष उपक्रम महसूल आणि जिल्हा परिषद प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबवला जात आहे. सिंधुदुर्ग हा देशातील पहिला 'एआय 'युक्त जिल्हा म्हणून जाहीर झाला आहे. जिल्हा आपलो प्रशासनामध्ये सर्वत्र एआय चा वापर सुरू झाला आहे. आता सिंधुदुर्ग हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे. हा उपक्रम राबवण्यासाठी शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत असून आतापर्यंत दोन कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील ८० तज्ञ शिक्षकांची निवड करण्यात आली असून आतापर्यंत ६० गावांची माहिती संकलित करण्यात आली आहे. गावाचा इतिहास त्याची वैशिष्ट्ये शैक्षणिक सुविधा धार्मिक स्थळे पर्यटन स्थळे, त्यांची छायाचित्रे गावाची सर्वांगीण माहिती देणारी आकडेवारी आदीचा समावेश आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि तज्ञ शिक्षक या कामी अहोरात्र मेहनत घेत आहेत.