सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार बारामतीतून; अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. अमोल शिंदे यांच्याकडे

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदाचा गेल्या दीड वर्षांपासून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पदभार सांभाळणारे डॉ. अनंत डवंगे यांच्याकडील अधिष्ठातापदाचा कार्यभार तडकाफडकी काढून घेण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार बारामतीतून; अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. अमोल शिंदे यांच्याकडे
सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार बारामतीतून; अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. अमोल शिंदे यांच्याकडे
Published on

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदाचा गेल्या दीड वर्षांपासून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पदभार सांभाळणारे डॉ. अनंत डवंगे यांच्याकडील अधिष्ठातापदाचा कार्यभार तडकाफडकी काढून घेण्यात आला आहे. त्यांच्या जागी बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. अमोल शिंदे यांच्याकडे सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

डॉ. डवंगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह महाविद्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार नुकताच सुरळीत होण्याच्या मार्गावर असतानाच शासनाकडून अचानक हा निर्णय घेण्यात आल्याने महाविद्यालयातील प्राध्यापक, डॉक्टर, नर्सेस तसेच कर्मचारी वर्गात खळबळ उडाली आहे. या निर्णयाबाबत अनेकांकडून नाराजी व्यक्त होत असून, शासनाच्या कार्यपद्धतीबाबतही तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

शल्यचिकित्सा विभागाचे प्राध्यापक असलेले डॉ. डवंगे हे अधिष्ठातापदाची प्रशासकीय जबाबदारी सांभाळतानाच वैद्यकीय सेवा आणि शस्त्रक्रियांचे कामही करत होते. जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या विविध आरोग्य शिबिरांमध्ये त्यांनी सहभाग घेत अनेक शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यामुळे प्रशासकीय जबाबदारीसोबतच वैद्यकीय सेवेतही ते सक्रिय असल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, शासनाला डॉ. डवंगे यांची कार्यपद्धती मान्य नसेल किंवा त्यांच्याकडून अपेक्षित पद्धतीने कारभार होत नसल्याचे शासनाचे मत असेल, तर सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयासाठी कायमस्वरूपी अधिष्ठाता नियुक्त करावा. अन्यथा याच महाविद्यालयातील अन्य पात्र प्राध्यापकाकडे अधिष्ठातापदाचा कार्यभार सोपवावा, अशी मागणी महाविद्यालयातील काही घटकांकडून होत आहे.

शासनाच्या या आकस्मिक निर्णयामुळे डॉ. अमोल शिंदे यांच्यावर आता बारामती आणि सिंधुदुर्ग या दोन्ही वैद्यकीय महाविद्यालयांचा कार्यभार सांभाळण्याची अतिरिक्त जबाबदारी आली आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणच्या प्रशासकीय कामकाजाचा समन्वय साधताना त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे.

महाविद्यालयाच्या प्रशासकीय भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह

सिंधुदुर्गात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात काही काळ कायमस्वरूपी अधिष्ठात्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर मात्र अधिष्ठातापदाचा कार्यभार कधी रत्नागिरी, तर कधी कोल्हापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांकडे सोपविण्यात आला. मात्र डॉ. अनंत डवंगे हे सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयातच प्राध्यापक म्हणून कार्यरत असल्याने त्यांच्याकडे अधिष्ठातापदाचा कार्यभार देण्यात आला होता. आता अचानक त्यांच्याकडून हा कार्यभार काढून घेण्यात आल्याने सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासकीय भवितव्याबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in