

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत स्वबळाच्या घोषणांचा सूर अधिकच तीव्र झाला आहे. भाजपने आधीच स्वबळावर लढण्याची भूमिका जाहीर केली असतानाच आता शिंदे गटानेही स्वतंत्र लढाईचा नारा देत राजकीय वातावरण ढवळून काढले आहे. महायुतीतील दोन्ही घटक पक्षांमध्ये प्रत्यक्ष संघर्ष निर्माण झाल्यास त्याचा फायदा ठाकरे गटाला होण्याची शक्यता असल्याची स्पष्ट कबुली शिंदे सेनेचे प्रवक्ते आणि माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.
सावंतवाडीतील पत्रकार परिषदेत केसरकर म्हणाले की, राज्यात महायुतीची सत्ता आहे, त्यामुळे एकत्र लढणे गरजेचे होते. परंतु भाजपाने स्वबळाचा निर्णय घेतला असल्यास आम्हीदेखील स्वबळावर लढण्यास तयार आहोत. मात्र एकत्र न लढल्याने ठाकरे सेनेला जागा मिळाल्या, तर त्यासाठी भाजपच जबाबदार असेल.
सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी लोकाभिमुख, सतत जनतेशी संपर्कात राहणारा आणि प्रशासनाची योग्य जाण असलेला उमेदवार देणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले. वेंगुर्ला आणि मालवणमध्ये शिंदे सेना विजयी ठरेल, तर कणकवलीतील रणनीती स्थानिक नेतृत्वच ठरवेल, असेही ते म्हणाले.
दरम्यान, जिल्ह्यातील महायुतीच्या परिस्थितीवर भाष्य करताना केसरकर यांनी भाजपला थेट इशारा दिला. आपण तिघेही वेगवेगळ्या चिन्हांवर निवडून आलो आहोत.
दोन शिवसेना आणि एक भाजपाचा आमदार महायुतीत आहे. तरीही भाजप स्वबळाच्या भूमिकेवर ठाम असेल, तर ते चुकीचे ठरेल, असे ते म्हणाले. निलेश राणे यांच्याशी झालेल्या चर्चेत त्यांनीही तडजोडीची तयारी दर्शवल्याचे केसरकरांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर कणकवलीत ‘दोन सेना विरुद्ध भाजप’ असा सरळ सामना होऊ शकतो. भाजपकडून माजी नगराध्यक्ष समीर नलावडे आणि बंडू हर्णे यांची नावे चर्चेत आहेत.
कणकवलीत ‘दोन सेना एकत्र?’
कणकवली नगरपंचायत निवडणुकीत ‘शहर विकास आघाडी’च्या नावाखाली शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. स्थानिक स्तरावर काही नेत्यांनी अलीकडेच बैठक घेतल्याचे बोलले जात असून, दोन्ही गटांमध्ये अनपेक्षितरीत्या आघाडी होण्याची शक्यता वर्तवली जाते. जर ही आघाडी झाली, तर उबाठा सेनेचे माजी नगराध्यक्ष संदेश पारकर हे नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी करणार असल्याचे समजते.