

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओसरगाव टोल नाक्यावर टोल वसुलीला जरी सुरुवात झाली तरी जिल्ह्यातील वाहनांकडून (एमएच-०७) टोल घेतला जाणार नाही, याची जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून हमी देतो, अशा शब्दांत पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हावासीयांना दिलासा दिला. वादळी वारे आणि पावसाचा फटका बसलेल्या सावंतवाडी शहराला राणे यांनी शनिवारी सकाळी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील आश्वासन दिले.
तीन वर्षांपूर्वी जेव्हा टोलवसुलीचा प्रयत्न झाला होता तेव्हा आमदार असताना आपण टोलवसुली होऊ दिली नाही. व्यापारी संघाचे अध्यक्ष संजय सावंत हे माझ्या संपर्कात होते, आहेत तेव्हा पालकमंत्री या नात्याने जिल्ह्यातील वाहनांकडून टोल वसूल केला जाणार नाही, असे राणे यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग-66 वर टोल वसुलीची प्रक्रिया सुरु केली असून कणकवली जवळ ओसरगाव टोल नाक्यावर टोलवसुली करण्यासाठी संस्था नेमण्यासाठी निविदा काढली आहे. निविदा निघताच जिल्ह्यात संतप्त प्रतिक्रिया उमतटल्या असून टोलविरोधी कृती समिती आणि व्यापारी संघाने स्थानिकांकडून टोल वसूल करण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आले असता त्यांनी वरील आश्वासन दिले.
सिंधुदुर्गवर टोळधाड का..?
गोव्याला टोलमाफी तर मग सिंधुदुर्गवासीयांवर टोळधाड कशासाठी असा सवाल कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केला असून टोलविरोधी आंदोलनासाठी सिंधुदुर्गवासीयांनी आता सज्ज राहावे, असे आवाहन केले आहे.
ओसरगाव टोल नाका येथे आम्ही टोलवसुली होऊ देणार नाही. मात्र पोलीस बळाचा वापर करून जर तसा प्रयत्न झाला तर मग जिल्हावासीयांतर्फे तीव्र लढा उभारण्यात येईल, असा इशारा पारकर यांनी दिला आहे.
या टोल नाक्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दोन भाग पडणार आहेत. कणकवलीसह देवगड, वैभववाडी आणि मालवण तालुक्यातील कांही गावांमधील ग्रामस्थांना जिल्हा मुख्यालयातील सर्व शासकीय कार्यालये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आदी ठिकाणी वरचेवर ये-जा करावी लागते हे लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्वच एमएच-07 नोंदणीकृत सर्वच वाहनांना टोलमाफी मिळावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
व्यापाऱ्यांचाही विरोध..!
ओसरगाव टोल नाक्यावरील टोल वसुलीला जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. टोल विरोधी कृती समितीनेही आंदोलनाचा इशारा दिला असून स्थानिकांना ये-जा करण्यासाठी ओसरगाव टोल नाक्याजवळ पर्यायी मार्ग तयार करावा अशी मागणीही कृती समिती आणि व्यापारी संघाने केली आहे. सिंधुदुर्गातील सर्व वाहनांना टोलमाफी द्यावी तसेच ओसरगाव येथे पर्यायी मार्ग तयार करावा, अशीही मागणी जिल्हावासीयांनी केली आहे.