सिंधुदुर्ग-मुंबई विमानात तांत्रिक बिघाड; प्रवाशांना बसने मोपा विमानतळावर हलविले; विमानाचे दोनदा उड्डाण रद्द

सिंधुदुर्ग विमानतळावरून मुंबईकडे जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. विमानातील बिघाड वेळेत दुरुस्त न झाल्याने अखेर सर्व प्रवाशांची बसने गोव्यातील मोपा विमानतळावर जाण्याची व्यवस्था करण्यात आली.
सिंधुदुर्ग-मुंबई विमानात तांत्रिक बिघाड; प्रवाशांना बसने मोपा विमानतळावर हलविले; विमानाचे दोनदा उड्डाण रद्द
सिंधुदुर्ग-मुंबई विमानात तांत्रिक बिघाड; प्रवाशांना बसने मोपा विमानतळावर हलविले; विमानाचे दोनदा उड्डाण रद्दसंग्रहित छायाचित्र
Published on: 

कुडाळ : सिंधुदुर्ग विमानतळावरून मुंबईकडे जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. विमानातील बिघाड वेळेत दुरुस्त न झाल्याने अखेर सर्व प्रवाशांची बसने गोव्यातील मोपा विमानतळावर जाण्याची व्यवस्था करण्यात आली. विमानातील नेमका बिघाड काय होता आणि उड्डाण कधी होणार ? याबाबत स्पष्ट माहिती दिली जात नसल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्गहून मुंबईला जाण्यासाठी प्रवासी विमानतळावर दाखल झाले होते. सर्व प्रवासी विमानात बसल्यानंतर विमानातील वातानुकूलन यंत्रणा सुरू नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर प्रवाशांना विमानातून खाली उतरविण्यात आले. काही वेळाने पुन्हा विमानात बसविण्यात आले; मात्र तांत्रिक बिघाडाचे कारण देत दुसऱ्यांदा विमानातून खाली उतरविण्यात आले.

विमानातील तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी गोव्याहून अभियंत्याला पाचारण करण्यात आले. अभियंत्यांकडून तपासणी केल्यानंतरच विमानाच्या उड्डाणाबाबत निर्णय घेतला जाईल, असे प्रवाशांना सांगण्यात आले. मात्र, बराच वेळ उलटूनही बिघाड दुरुस्त न झाल्याने प्रवाशांना पुढील प्रवासासाठी बसची व्यवस्था करून मोपा विमानतळावर नेण्यात आले.

या प्रकारामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. विशेषतः प्रथमच सिंधुदुर्ग विमानतळावरून प्रवास करणारे प्रवासी, ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबासह प्रवास करणाऱ्यांना याचा अधिक त्रास सहन करावा लागला. वारंवार विमानातून उतरविणे, पुन्हा बसविणे आणि त्यानंतर दुसऱ्या विमानतळावर जाण्याची वेळ आल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली.

दरम्यान, विमानातील बिघाडाचे नेमके कारण, उड्डाणास होणारा विलंब आणि पर्यायी प्रवासाचे नियोजन याबाबत स्पष्ट माहिती दिली जात नसल्याची तक्रार प्रवाशांनी केली. प्रवाशांच्या पुढील नातेवाइकांनाही प्रवासाबाबत वेळेवर माहिती मिळत नसल्याने चिंता व्यक्त करण्यात आली. विमानसेवा पुरविणाऱ्या यंत्रणेने अशा प्रसंगी प्रवाशांना वेळेवर माहिती देऊन योग्य नियोजन करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)