सिंधुदुर्ग-मुंबई विमानसेवा सुरू; ढोल-ताशांच्या गजरात प्रवाशांचे स्वागत; पालकमंत्री नितेश राणे यांची उपस्थिती

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला नवी दिशा देणारी आणि जिल्हावासीयांसाठी दळणवळणाची महत्त्वपूर्ण सुविधा ठरणारी सिंधुदुर्ग-मुंबई विमानसेवा दोन वर्षांच्या प्रदीर्घ खंडानंतर पुन्हा सुरू झाली.
सिंधुदुर्ग-मुंबई विमानसेवा सुरू; ढोल-ताशांच्या गजरात प्रवाशांचे स्वागत; पालकमंत्री नितेश राणे यांची उपस्थिती
सिंधुदुर्ग-मुंबई विमानसेवा सुरू; ढोल-ताशांच्या गजरात प्रवाशांचे स्वागत; पालकमंत्री नितेश राणे यांची उपस्थितीX|NiteshNRane
Published on: 

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला नवी दिशा देणारी आणि जिल्हावासीयांसाठी दळणवळणाची महत्त्वपूर्ण सुविधा ठरणारी सिंधुदुर्ग-मुंबई विमानसेवा दोन वर्षांच्या प्रदीर्घ खंडानंतर पुन्हा सुरू झाली. या विमानसेवेच्या शुभारंभानिमित्त चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावर ढोल-ताशांच्या गजरात मुंबईहून आलेल्या प्रवाशांचे औक्षण करून पुष्प व मिठाई देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले. पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केक कापून आनंदोत्सव साजरा केला. तसेच मुंबईकडे जाणाऱ्या पहिल्या प्रवाशाला त्यांच्या हस्ते बोर्डिंग पासचे वितरण करण्यात आले. यावेळी त्यांनी सर्व प्रवाशांना शुभेच्छा दिल्या. सुरू झालेली ही विमानसेवा भविष्यात कधीही बंद पडणार नाही, अशी ठाम ग्वाही पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.

चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावर फ्लाय ९१ कंपनीच्या विमानसेवेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, आमदार नीलेश राणे, आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, सिंधुदुर्गाची पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याची आर्थिक प्रगती व्हावी, हे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचे स्वप्न आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. केंद्र सरकारच्या संबंधित मंत्रालयांशी संपर्क, पत्रव्यवहार तसेच केंद्रीय मंत्र्यांकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे विमानसेवा पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नांना गती मिळाली. जिल्ह्याला पर्यटनाच्या माध्यमातून विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे ते म्हणाले.

विमान कंपन्यांना सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या धावपट्टी, वेळेची मर्यादा, रस्ते, जागेची उपलब्धता आणि विशेषतः रात्रीच्या वेळी विमान उतरविण्याची सुविधा अशा विविध बाबींची पूर्तता करणे आवश्यक होते. गेल्या दोन वर्षांत या सुविधा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे भविष्यात मोठ्या विमान कंपन्यांनाही सिंधुदुर्ग विमानतळावरून सेवा देणे शक्य होणार आहे. रत्नागिरीतील विमानतळ सुरू होण्यासाठी रत्नागिरीचे पालकमंत्री व उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रयत्न केले पाहिजेत. रत्नागिरीचे विमानतळ सुरू लवकरात लवकर करावे, अशी तमाम रत्नागिरीकरांची मागणी आहे. रत्नागिरीच्या धावपट्टीचा प्रश्न संपलेला नाही, असे विमानतळ सूत्रांनी सांगितले.

स्थानिकांनी सेवा पुरवाव्यात

विमानतळामुळे पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण होतील. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी टुरिस्ट गाड्या, पर्यटनाशी संबंधित व्यवसाय आणि विविध सेवा स्थानिक तरुण-तरुणींच्या मालकीच्या असाव्यात. बाहेरील व्यावसायिकांपेक्षा जिल्ह्यातील तरुणांना या संधींचा लाभ मिळाला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)