'पक्षप्रवेश करायचा तर उघडपणेच करेन'; शिंदेंच्या बैठकीत संदेश पारकरांची उपस्थिती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत आयोजित केलेल्या राज्यातील ६३ नगराध्यक्षांच्या बैठकीला कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी उपस्थिती लावल्याने सिंधुदुर्गच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर
Published on: 

सिंधुदुर्ग : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत आयोजित केलेल्या राज्यातील ६३ नगराध्यक्षांच्या बैठकीला कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी उपस्थिती लावल्याने सिंधुदुर्गच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. एकीकडे शिवसेनेच्या शिंदे गटाकडून चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ची पार्श्वभूमी आणि दुसरीकडे पारकरांची शिंदेंच्या व्यासपीठावरील उपस्थिती यामुळे त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

संदेश पारकर हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते आहेत. गेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी शहर विकास आघाडीच्या माध्यमातून आणि शिंदे गटाच्या पाठिंब्यावर भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला होता. त्यामुळे आता शिंदेंच्या बैठकीतील त्यांच्या उपस्थितीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. ठाकरे गटातील लोकप्रतिनिधींना आपल्या पक्षात आणण्याच्या प्रयत्नांना ‘ऑपरेशन टायगर’ असे संबोधले जात आहे. याच पार्श्वभूमीवर पारकर शिंदे गटाच्या जवळ जाणार का? अशा चर्चांना सुरुवात झाली. मात्र, या चर्चांवर पारकर यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.

'माझी उपस्थिती केवळ कणकवली शहराच्या विकासकामांसाठी होती. कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय मी घेतलेला नाही. भविष्यात पक्षप्रवेश करायचा झालाच, तर तो लपूनछपून करणार नाही, जाहीरपणे घोषणा करूनच करेन,' असे पारकर यांनी स्पष्ट केले.

नगराध्यक्ष म्हणून शहराच्या विकासासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी घेणे ही आपली जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले. या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसून, केवळ कणकवलीच्या विकासकामांवर चर्चा झाल्याचे त्यांनी नमूद केले.

विकासकामांचा आढावा घेण्याचे आश्वासन

पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवलीच्या विकासासाठी २० लाख रुपयांचा निधी दिल्याची माहितीही त्यांनी दिली.दरम्यान, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दर तीन महिन्यांनी राज्यातील नगराध्यक्षांची बैठक घेऊन त्यांच्या शहरांतील विकासकामांचा आढावा घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे विकासकामांसाठी पारकरांनी लावलेली उपस्थिती आणि त्यानंतर केलेला स्पष्ट खुलासा सध्या सिंधुदुर्गच्या राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)