राजन चव्हाण/सिंधुदुर्ग
जिल्हा निवडणूक विभागाने गेल्या दोन महिन्यांपासून राबविलेल्या सखोल मतदार पुनरीक्षण मोहिमेत (एसआयआर) सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल ८२ हजार ५८८ मतदारांची घट झाली आहे. यामध्ये ३६ हजार ६०६ मृत मतदार, ३३ हजार ७६२ जिल्ह्याबाहेर स्थलांतरित झालेले मतदार, तर १२ हजार २२० मतदारांशी संपर्क होऊ न शकलेल्यांचा समावेश आहे.
या मोहिमेमुळे जिल्ह्यातील एकूण मतदारसंख्या ६ लाख ८८ हजार १४ वरून घटून ६ लाख ५ हजार ४२६ इतकी झाली आहे. मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभर एसआयआर मोहीम राबविण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही मोहीम आता पूर्ण झाली आहे.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि उपनिवडणूक अधिकारी शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. पडताळणीदरम्यान मृत, स्थलांतरित तसेच संपर्क होऊ न शकलेले मतदार आढळून आले. त्यामुळे संबंधित नावे वगळण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर दावे आणि हरकती नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे अंतिम मतदार यादीत सध्याच्या आकडेवारीपेक्षा काही प्रमाणात फरक पडण्याची शक्यता जिल्हा निवडणूक शाखेने व्यक्त केली आहे.
मृत आणि स्थलांतरित मतदारांपैकी सुमारे ७० हजार नावे वगळली जाणे जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र, संपर्क होऊ न शकलेल्या उर्वरित मतदारांनी आवश्यक कागदपत्रे आणि पुरावे सादर केल्यास त्यांच्या नावांचा मतदार यादीत समावेश होऊ शकतो. त्यामुळे अंतिम मतदारसंख्येत काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.
दुबार मतदारांचे मॅपिंग
अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही मतदार नोंदणीची प्रक्रिया निरंतर सुरू राहणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागात किंवा राज्यातील अन्य ठिकाणी एकाच मतदाराचे नाव असल्यास अशा दुबार नोंदींचेही ‘मॅपिंग’ करण्यात येत आहे. संबंधित मतदारांना एका ठिकाणी मतदार यादीतील नाव कायम ठेवण्याबाबत कळविण्यात येणार असल्याचे निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे.
सिंधुदुर्गच्या कामाचे कौतुक
राज्य निवडणूक आयोगाने नुकतीच पुणे येथे एसआयआर मोहिमेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्याने केलेल्या उल्लेखनीय कामाचे कौतुक करण्यात आले. निवडणूक आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाचे, विशेषतः जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि उपनिवडणूक अधिकारी शेवाळे यांचे विशेष अभिनंदन केले.
सावंतवाडीत सर्वाधिक घट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली असे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ३० हजार १४७ मतदारांची घट झाली आहे. या मतदारसंघात पूर्वी २ लाख ३४ हजार ५१९ मतदार होते. कुडाळ विधानसभा मतदारसंघात २७ हजार ४५६ मतदारांची घट झाली असून, पूर्वी या मतदारसंघात २ लाख १९ हजार २४४ मतदार होते, तर कणकवली विधानसभा मतदारसंघात २४ हजार ९८५ मतदारांची घट झाली असून, पूर्वी या मतदारसंघात २ लाख ३४ हजार २५१ मतदार होते.