

सिंधुदुर्ग : कोकणातील हजारो वर्षांच्या धार्मिक परंपरा, देवस्थानांचे पारंपरिक अधिकार आणि मानकरी-सेवेकऱ्यांची व्यवस्था जतन करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वतंत्र देवस्थान व्यवस्थापन समिती स्थापन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अखत्यारितून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवस्थाने मुक्त करून स्वतंत्र सिंधुदुर्ग जिल्हा (कोकण) देवस्थान व्यवस्थापन समिती स्थापन करावी, यासाठी जिल्ह्यातील देवस्थानांचे मानकरी, पदाधिकारी आणि धार्मिक क्षेत्रातील प्रतिनिधी एकवटले आहेत. कुडाळचे आमदार नीलेश राणे यांनी आगामी नागपूर हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अखत्यारित सांगली, कोल्हापूरसह सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील देवस्थाने आहेत. १९६९ मध्ये कोकणातील देवस्थाने या समितीकडे वर्ग करण्यात आली. मात्र, भौगोलिक अंतरामुळे देवस्थानांचे मानकरी, पुजारी आणि विधिमंडळात आवाज मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
सेवेकऱ्यांना साध्या प्रशासकीय कामांसाठीही कोल्हापूर येथे जावे लागते. तसेच ग्रामसभेच्या माध्यमातून व्यवस्थापन समित्यांची निवड होत असल्याने पारंपरिक धार्मिक व्यवस्थेत वाद निर्माण होत असल्याची तक्रार मानकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.
कोकणातील देवस्थानांची व्यवस्था बारा-पाच संप्रदायाच्या परंपरेवर आधारित आहे. मानकरी, सेवेकरी आणि पुजारी यांना या व्यवस्थेत महत्त्वाचे स्थान आहे. मात्र, ग्रामसभेतील बहुमताच्या आधारे व्यवस्थापन ठरत असल्याने पारंपरिक अधिकार आणि मानपानाच्या प्रश्नांवरून वाद निर्माण होत असल्याचे देवस्थान प्रतिनिधींचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सावंतवाडी राजवाड्यात देवस्थान मानकऱ्यांची बैठक झाली. विलास सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत सावंतवाडी तालुका देवस्थान व्यवस्थापन समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढे सावंतवाडी आणि माणगाव येथे झालेल्या मेळाव्यांमध्ये स्वतंत्र सिंधुदुर्ग जिल्हा देवस्थान व्यवस्थापन समितीची मागणी करण्यात आली.
३० सप्टेंबर २०२५ रोजी विधी व न्यायमंत्री आशिष जयस्वाल यांनी मंत्रालयात या विषयावर बैठक घेतली होती. या बैठकीत कोकणातील धार्मिक परंपरा, संबंधित कायदेशीर तरतुदींच्या आधारे स्वतंत्र समितीची आवश्यकता मांडण्यात आली.
स्वतंत्र समितीची मागणी
अखेर पंढरी राऊळ आणि ज्ञानेश्वर परब यांच्या नेतृत्वाखाली गाव-हाटी पुरस्कृत देवस्थान समन्वय समितीच्या २१ गावांतील मानकऱ्यांच्या शिष्टमंडळाने आमदार नीलेश राणे यांची भेट घेतली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अखत्यारितील अडचणी आणि स्वतंत्र समितीची आवश्यकता मांडण्यात आली. आगामी नागपूर हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करून सिंधुदुर्गातील देवस्थानांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन आमदार राणे यांनी दिले. त्यामुळे स्वतंत्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या मागणीला आता