

धैर्य गजरा/ मुंबई
देशातील पहिला पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गात आतापर्यंत पंचतारांकित हॉटेल नव्हते. त्यामुळे परदेशी व उच्चभ्रू पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या. आता मंगळवारी झालेल्या एका ऐतिहासिक त्रिपक्षीय करारामुळे महाराष्ट्राच्या किनारी भाग असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला पहिले पंचतारांकित हॉटेल मिळणार आहे.
‘द इंडियन हॉटेल्स कंपनी लि.’ ने जमीन मालकांना प्रतिहेक्टरी १.४४ कोटी रुपये देण्याचे मान्य केले आहे. यामुळे शिरोडा आणि वेळागर या किनारी गावांमध्ये पसरलेल्या अलिशान रिसॉर्टच्या उभारणीतील ३२ वर्षांचा तिढा सुटला आहे.
मंगळवारी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, ‘ताज हॉटेल्स’ची मालकी असलेली ‘आयएचसीएल’ आणि ‘शिरोडा-वेळागर जमीन मालक सहकारी संस्था मर्यादित’ यांच्यात हा करार झाला. या करारांतर्गत, आयएचसीएल शिरोडा-वेळागर येथील ५४.४० हेक्टर जमिनीवर अलिशान रिसॉर्ट विकसित करणार असून, स्थानिक जमीन मालकांना थेट प्रतिहेक्टरी १.४४ कोटी रुपयांची भरपाई देणार आहे.
शिरोडा-वेळागर येथे प्रीमियम टूरिस्ट रिसॉर्ट उभारण्याचा प्रस्ताव सर्वप्रथम १९९४ मध्ये मांडला होता. पण नुकसानभरपाई मिळत नसल्याने स्थानिकांचा विरोध होता.
स्थानिकांनी ‘शिरोडा-वेळागर जमीन मालक सहकारी संस्था मर्यादित’ स्थापन केल्यानंतर त्यांची क्षमता लक्षणीयरीत्या वाढली. डिसेंबर २०२५ मध्ये मंत्री देसाई यांनी राज्य शासन, आयएचसीएल आणि ग्रामस्थांमधील त्रिपक्षीय कराराला तत्त्वतः मान्यता दिली होती.
पात्र प्रकल्पग्रस्तांना नोकरीत प्राधान्य
करारातील अटींनुसार, पात्र प्रकल्पग्रस्त व्यक्ती (PAP) आणि स्थानिक रहिवाशांना नोकरीत प्राधान्य दिले जाईल; तसेच स्थानिक तरुणांची रोजगारक्षमता वाढवण्यासाठी आयएचसीएलद्वारे आदरातिथ्य क्षेत्रातील व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातील.