
मुंबई : स्कुबा डायव्हिंग व पाणबुडीद्वारे पर्यटन, समुद्र तळात जहाजाची अनोखी सफर पर्यटकांना अनुभवता येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील निवती राॅकजवळ प्रवाळात पाण्याखाली संग्रहालय व जहाजाभोवती कृत्रिम प्रवाळ निर्माण करण्यात येणार असून भारतातील पहिला उपक्रम आहे.
या प्रकल्पामुळे पर्यटनाला चालना मिळणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे व मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
समुद्रात विराजमान होणाऱ्या जहाजाभोवती प्रवाळ निर्मिती होऊन त्याद्वारे स्कुबा डायव्हिंग व भविष्यात पाणबुडीद्वारे पर्यटन करता येणे शक्य होणार आहे. केंद्र शासनाने ऐतिहासिक पाऊल उचलत भारतीय नौदलाचे निवृत्त जहाज आयएनएस गुलदार हे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे सुपूर्द केले आहे. जगातील अनेक देशात असे प्रकल्प तयार केले आहेत. हा प्रकल्प तयार करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या मान्यतेने भारतीय नौदलाने निवृत्त युद्धनौका महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास विना मोबदला उपलब्ध करून दिली आहे.
केंद्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण पर्यटनस्थळांचा विकास करणे या योजनेंतर्गत ‘स्पेशल असिस्टंट्स टू स्टेटस फॉर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट’ महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा आयएनएस गुलदार सेवानिवृत्त युद्धनौका निवती रॉक जवळ समुद्रात संग्रहालय आणि कृत्रिम रीफमध्ये रूपांतरित करणे या प्रकल्पास केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने २७ डिसेंबर २०२४ रोजी ४६.९१ कोटीस मान्यता दिली आहे. भारतीय नौदलाने सदरचे निवृत्त जहाज पोर्टब्लेअर, अंदमान येथून कारवार नेव्हल बेस, कर्नाटक याठिकाणी स्वखर्चाने पोहोच करण्याची महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची विनंती मान्य केली.
१,१२० टन वजन, ८३.९ मीटर लांब जहाज
जहाजाचे १,१२० टन वजन आहे. तर ८३.९ मीटर लांबी असून ९.७ मीटर रुंदी आहे. ५.२ मीटर खोली आहे. हे जहाज १२ जानेवारी २०२४ रोजी सेवानिवृत्त झाले आहे.
२२ फेब्रुवारी २०२४ रोजी ताबा
भारतीय नौदलाकडून बोटीचा अधिकृतरीत्या २२ फेब्रुवारी २०२४ रोजी कारवार नेवल बेस येथे बोटीचा अधिकृत ताबा घेण्यात आला. कारवार येथून विजयदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग येथे जहाज टो करून घेऊन येणे. हे जहाज १६ मार्च २०२५ रोजी कारवार येथून विजयदुर्ग येथील महाराष्ट्र सागरी मंडळाच्या जेट्टीवर सुरक्षितरीत्या आणण्यात आले.