सिंधुदुर्गनगरी ते मालवण रस्ता काँक्रीटीकरण होणार; ३०५ कोटींचा निधी मंजूर

कुडाळ- मालवणचे शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार सिंधुदुर्गनगरी प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते रानबांबुळी कट्टा चौके ते मालवण- देऊळवाडा रस्ता या कामासाठी राज्य सरकारने ३०२ कोटींचा निधी मंजूर केला आहे.
सिंधुदुर्गनगरी ते मालवण रस्ता काँक्रीटीकरण होणार; ३०५ कोटींचा निधी मंजूर
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

सिंधुदुर्ग: कुडाळ- मालवणचे शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार सिंधुदुर्गनगरी प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते रानबांबुळी कट्टा चौके ते मालवण- देऊळवाडा रस्ता या कामासाठी राज्य सरकारने ३०२ कोटींचा निधी मंजूर केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या काळात आमदार निलेश राणे यांनी आपल्या जाहीरनाम्यात याबाबतचे आश्वासन दिले होते त्याची पूर्तता केली आहे.

या पूर्ण रस्त्याची लांबी ३० कि.मी.असून रुंदी ७ मीटर आहे. या रस्त्याचे काँक्रीटीकरण होणार आहे. या रस्त्यावरील धोकादायक वळणे व दरडप्रवण भागात संरक्षकभिंती तसेच जीर्ण झालेल्या पुलांच्या जागी नवीन पूल बांधकाम करणे, सखल भागात भर टाकून रस्त्याची उंची वाढविणे इ. प्रकारची कामे होणार आहेत.

हा रस्ता पर्यटनासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरणार असून मालवणमध्ये येणाऱ्या पर्यटकांना यामुळे फार मोठा दिलासा मिळणार आहे.

या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती, त्याची दखल घेऊन आमदार निलेश राणे यांनी आपल्या विकास आराखड्यात या रस्त्याचा समावेश केला होता, राज्य सरकारच्या मंजुरीमुळे आमदार निलेश राणे यांच्या विकास आराखड्यातील महत्वाचे काम पूर्ण झाले असून आमदार निलेश राणे यांनी याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानले आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in